शंकरराव मोहिते-पाटील सहकारी बँकेत २७ कोटींचा अपहार

बँकेच्या सरव्यवस्थापकासह पाच शाखा व्यवस्थापकांच्या विरोधात अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संग्रहीत फोटो

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अकलूज येथील सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी बँकेच्या अकलूजच्या मुख्य शाखेसह अन्य पाच शाखांमध्ये मिळून २७ कोटींपेक्षा अधिक रकमेचा अपहार झाल्याचे उजेडात आले आहे. याप्रकरणी बँकेच्या सरव्यवस्थापकासह पाच शाखा व्यवस्थापकांच्या विरोधात अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 याच वर्षात ३ एप्रिल ते १० आॕक्टोबर या कालावधीत संगधमताने हा अपहार झाला आहे. यासंदर्भात बँकेचे वैधानिक लेखा परीक्षक गोकुळ राठी (रा. पर्वती, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बँकेचे सरव्यवस्थापक नितीन बाळकृष्ण उघडे (वय ४०, रा. अकलूज) यांच्यासह बँकेच्या टेंभुर्णी शाखेचे व्यवस्थापक रवींद्र पताळे, करमाळा शाखेचे व्यवस्थापक समीर दोशी, सोलापूर शाखेचे व्यवस्थापक प्रदीप उघडे, इंदापूर शाखेचे व्यवस्थापक सचिन सावंत आणि पुण्यातील कोथरूड शाखेचे व्यवस्थापक राहुल भिंगारदिवे यांच्या विरोधात महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण कायद्यासह फसवणूक आदी विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे.

बँकेच्या अकलूज येथील मुख्य शाखेतच २४ कोटी १८ लाख २१ हजार ८५३ रूपयांचा अपहार झाला आहे. तर टेंभुर्णी शाखेत ५३ लाख ८४ हजार, करमाळा शाखेत एक कोटी ४० लाख ८४ हजार ४६१ रूपये, सोलापूर शाखेत ५३ लाख ५० हजार, इंदापूर शाखेत सहा लाख ५० हजार आणि पुण्याच्या कोथरूड शाखेत ३३ लाख ४५ हजार ८०० रूपये असे मिळून एकूण २७ कोटी ६ लाख १९ हजार ८१४ रूपयांचा अपहार सरव्यवस्थापकासह संबंधित शाखा व्यवस्थापकांच्या संगनमताने झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

अकलूजच्या मोहिते-पाटील घराण्यातील दिवंगत माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या ताब्यात ही बँक होती. त्यांच्या पश्चात बँकेचा ताबा त्यांचे पुत्र तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे आहे. धवलसिंह मोहिते-पाटील हे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यापासून यापूर्वीच दुरावले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Embezzlement of rs 27 crore in shankarrao mohite patil co operative bank srk

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या