Mumbai Police Recruitment Viral Video: पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक तरुण रात्रंदिवस मेहनत करतात. जेव्हा हे स्वप्न पूर्ण होते, तेव्हा होणारा आनंद शब्दांच्या पलीकडे असतो. असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा आणि डोळे पाणावणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात एक लहान भाऊ पोलीस झाल्यानंतर आपल्या मोठ्या भावाला वर्दीत भेटायला येतो आणि तिथे जे घडतं, ते पाहून लाखो लोक भावुक झाले आहेत.

मोठ्या भावाचे डोळे पाणावले

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, मोठा भाऊ आधीच वनरक्षक (Forest Officer) म्हणून सेवेत आहे. त्याचा लहान भाऊ नुकताच मुंबई पोलीस दलात भरती झाला आहे. गणवेश परिधान करून जेव्हा लहान भाऊ मोठ्या भावा समोर उभा राहिला, तेव्हा मोठा भाऊ क्षणभर स्तब्ध झाला. ज्या भावाच्या कष्टांसाठी आणि यशासाठी अनेक प्रार्थना केल्या, त्याला वर्दीत पाहून मोठ्या भावाचे अश्रू अनावर झाले.

पहिला सलाम अन् घट्ट मिठी

सर्वात हृदयस्पर्शी क्षण तो होता, जेव्हा पोलीस झालेल्या लहान भावाने आपल्या मोठ्या भावाला पहिला ‘सलामी’ ठोकला. आपल्या यशाचे श्रेय मोठ्या भावाला देत त्याने त्याला अभिमानाने सलाम केला. त्यानंतर मोठ्या भावाने त्याला घट्ट मिठी मारली. ही मिठी केवळ दोन भावांची भेट नव्हती, तर ती अनेक वर्षांच्या संघर्षाची, त्यागाची आणि जिद्दीच्या विजयाची पावती होती. आनंदाच्या भरात लहान भावाने आपल्या मोठ्या भावाला उचलून घेतले आणि आनंद साजरा केला.

नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर नेटकऱ्यांनी या दोन्ही भावांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “मोठा भाऊ हा बापाची सावली असतो, हे या व्हिडिओतून सिद्ध झाले,” अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर दुसऱ्या एकाने, “दोन्ही भावांनी खाकी वर्दीत राज्याची सेवा करण्याचे स्वप्न पूर्ण केले, याचा अभिमान वाटतो,” असे म्हटले आहे.

आजच्या काळात जिथे नात्यांमध्ये दुरावा येतोय, तिथे या दोन भावांचे निष्पाप प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर पाहून अनेकांनी ‘भाऊ असावा तर असा’ अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.