धुळ्यात १५०० रुपयांची लाच घेताना कर्मचाऱ्यास अटक

लाच लूचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

bribe, dhule,marathi news, marathi
( संग्रहीत छायाचित्र )
प्रॉपर्टी कार्डवर मालमत्ताधारकाचे नाव लावण्यासाठी १५०० रुपयांची लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्याला लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने हातोहात पकडले. धुळे सिटी सर्व्हे कार्यालयातील भुमापक आनंद शालीग्राम ठाकूर याला याप्रकरणी अटक करण्यात आली.  जुन्या कलेक्टर कचेरी परिसरातील नगर भुमापन अधिकारी कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खळबळ उडाली आहे. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने यासाठी सापळा लावला होता.

कारवाई विषयी एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, नगर भुमापन अधिकारी कार्यालयात परिरक्षक भुमापक म्हणून कार्यरत असलेल्या आनंद शालीग्राम ठाकूर (वय ३८) याला आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास तक्रारदाराकडुन १५०० रुपयांची लाच स्विकारताना साक्षीदार पंच यांच्या समक्ष हातोहात पकडण्यात आले.  आनंद ठाकूर याच्याकडे काही दिवसांपुर्वी धुळे शहरात बांधीव घर खरेदी करणाऱ्या एका नागरिकाने सिटी सर्व्हेकडील प्रॉपर्टी कार्डवर नाव लावण्यासाठी प्रकरण दाखल केले होते. यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता देखील करण्यात आली. पण हे प्रकरण ज्यावेळी ठाकूर याच्याकडे आले त्यावेळी त्यांनी संबंधित व्यक्तिकडे २ हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदाराने धुळे लाचलूचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली. धुळे पथकाने सिटी सर्व्हेत याची पडताळणी केल्यानंतर सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आले.

लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यावर १५०० रुपयांत तडजोड करण्यास सांगून आज १५०० रुपये लाच घेतांना आनंद ठाकूरला रंगेहाथ पकडले गेले. एसीबीचे पोलिस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले, उप अधिक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पो.नि.पवन देसले, पोनि महेश भोरटेकर यांच्या नेतृत्वाखाली हे.कॉ. जितेंद्र परदेशी, किरण साळी आणि पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. लाचखोर आनंद ठाकूरला अटक करुन याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Employee was arrested for taking a bribe of rs 1500 in dhule