पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांनी प्रभारी तहसीलदार संजय माळी यांना सोमवारी दुपारी शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी महसूल कर्मचा-यांनी थेट कार्यालयाच्या प्रवेशद्वारालाच कुलूप ठोकून काम बंद आंदोलन केले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख नीलेश लंके यांनी आंदोलकांची भेट घेऊन याबाबत दिलगिरी व्यक्त केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, आपल्या राजकीय विरोधकांनी शासकीय कर्मचा-यांना हाताशी धरून आपणाविरुद्ध षडयंत्र रचल्याचा आरोप शेळके यांनी केला आहे.
प्रभारी तहसीलदार माळी हे सोमवारी आपल्या दालनात कामकाज पाहत असताना दुपारी साडेबाराच्या सुमारास सभापती गणेश शेळके हे त्यांच्या दालनात आले. रस्त्याच्या कामासंदर्भात काय झाले याची विचारणा शेळके यांनी माळी यांच्याकडे केली. त्यावर हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने या प्रकरणी आपण कोणताही निर्णय देऊ शकत नाही असे उत्तर माळी यांनी दिले. त्यावर संतापलेल्या शेळके यांनी लोकप्रतिनिधींनी सांगितलेल्या कामांना इतका वेळ लागतो का, अशी विचारणा करीत महिला कर्मचा-यांसमवेत मोठमोठय़ाने आरडाओरड तसेच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शेळके यांच्या या प्रकाराने हतबल झालेल्या माळी यांनी काहीही उत्तर दिले नाही, त्यानंतर शेळके हे तेथून निघून गेले.
गेल्या दि. १ ला शेळके यांनी तहसील कार्यालयात जाऊन याच कामासंदर्भात अव्वल कारकून बी. जी. भांगरे यांच्याशी हुज्जत घालून त्यांनाही शिवीगाळ केली होती. त्या वेळी मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याने कर्मचा-यांनी काळ्या फिती लावून या प्रकराचा निषेध नोंदवला होता. त्यांनतर शेळके यांनी थेट तहसिलदारांवरच हल्ला चढविल्याने संतप्त कर्मचा-यांनी काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी जिल्हाधिका-यांना निवेदन देऊन बुधवारी सकाळीच तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून सकाळी साडेदहा वाजल्यापासून आंदोलन सुरू करण्यात आले. सर्व कर्मचारी कार्यालयाबाहेर बसून या घटनेचा निषेध करीत होते. कामासाठी आलेल्या नागरिकांवर मात्र या आंदोलनामुळे मनस्ताप सहन करण्याची वेळ आली.
दुपारी बाराच्या सुमारास शिवसेनेचे तालुकाप्रमुख नीलेश लंके यांनी आंदोलकांशी संपर्क साधून या प्रकरणी मध्यस्थी केली. आंदोलकांची भेट घेऊन शेळके यांच्याकडून झालेल्या प्रकाराबाबत लंके यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर कर्मचा-यांनी आंदोलन मागे घेतले व त्यानंतर कार्यालयाचे कामकाज पूर्ववत सुरू झाले.
दरम्यान, याप्रकरणी सभापती शेळके यांनीही आपली भूमिका मांडली असून, या आंदोलनामागे विरोधकांचे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. पंचायत समितीचा सभापती या नात्याने जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी शासकीय कार्यालयामध्ये पाठपुरावा केला, त्यात गैर काय असा सवाल त्यांनी केला. तहसील कर्मचारी अथवा तहसीलदार यांना आपण किंवा आपल्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ किंवा उर्मटपणाची भाषा वापरलेली नाही. राजकीय विरोधकांनी तहसील कर्मचा-यांना हाताशी धरून हे षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांनी केला आहे.