विनंती करूनही जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी निवेदन स्वीकारण्यास न आल्याने आमदार बच्चू कडू यांच्यासह अपंगांनी त्यांच्या दालनात ठिय्या मांडला. ‘सीईओ’ सुभाष डुंबरे यांच्या वर्तणुकीचा निषेध करीत अपंगांनी त्यांना घेराव घातला. या वेळी आधी दिलेल्या निवेदनाची कल्पनाही डुंबरे यांना नव्हती, हे विशेष. पोलिसांचे कडे तोडून आंदोलक डुंबरे यांच्या कक्षात घुसले, तेव्हा डुंबरे कक्षात नव्हते. अचानक सुरू झालेल्या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेत गोंधळ उडाला. अखेर डुंबरे हजर झाले आणि त्यांनी कडू यांच्याशी चर्चा केली. डुंबरे यांना घेराव घालून अपंगांनी मागण्यांकडे लक्ष वेधले.
प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या येथील शाखेतर्फे मोंढय़ातील मदानावर शुक्रवारी आमदार कडू यांच्या उपस्थितीत अपंग हक्क परिषद पार पडली. अपंगांची ग्रामपंचायत, नगरपालिका व महापालिका यांमध्ये शासन निर्णयाप्रमाणे नोंदणी, स्थानिक स्वराज्य संस्थेने अपंग कल्याण योजनेचा ३ टक्के निधी खर्च करावा, अपंगांना विनाअट घरकुल द्यावे आदी मागण्यांसाठी ही परिषद होती. परिषदेला उपस्थित राहून अपंगांचे निवेदन स्वीकारावे, अशी मागणी संघटनेने १४ मेला सीईओ डुंबरे यांच्याकडे केली होती. परिषद संपल्यानंतर सीईओ आले नसल्याने उपस्थित सर्व अपंग आणि आमदार कडू यांनी थेट जिल्हा परिषद गाठली. मात्र, तेथेही सीईओ नव्हते. त्यामुळे डुंबरे यांच्या दालनासमोर अपंगांनी घोषणाबाजी सुरू केली, तसेच दालनात घुसण्याचा प्रयत्न केला. याच वेळी डुंबरे दालनात हजर झाले. आमदार कडू यांनी डुंबरे यांच्याशी चर्चा केली. आपल्याला या आंदोलनाबाबत काहीही माहिती नव्हती. आपल्यापर्यंत कोणतेही निवेदन आलेच नाही, असे डुंबरे यांनी सांगितले. त्यावर कडू यांनी जि. प.ला दिलेल्या १४ मेच्या निवेदनाची प्रत दाखवली. तेव्हा डुंबरे यांनी संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले असता ते निवेदन त्याच टेबलवर राहिले असल्याचे उघड झाले. कडू यांनी अपंगांच्या विविध प्रश्नांचा डुंबरे यांच्यावर भडीमार केला. सरकारने ३ टक्के निधी खर्च करण्याचा घेतलेला निर्णय डुंबरे यांना माहिती नव्हता, हेही समोर आले. अखेर डुंबरे यांनी निधी खर्चासह अपंगांची नोंदणी पंधरवडय़ात केली जाईल, असे आश्वासन दिले. प्रहार संघटनेचे राज्य समन्वयक डॉ. संतोष मुंढे, विभागीय अध्यक्ष शहादेव उमप, मानव कांबळे, जिल्हाध्यक्ष सुनिल मुलगीर, राजाभाऊ अवचार, सय्यद अयास, संतराम अवचार, त्र्यंबक जटाळ उपस्थित होते. दरम्यान, गोंधळाची स्थिती निर्माण झाल्यानंतर पोलीस अधीक्षिका नियती ठाकर फौजफाटय़ासह जिल्हा परिषदेत दाखल झाल्या.
..तर सीईओंच्या खुच्र्या जप्त करू – कडू
अपंगांच्या प्रश्नाकडे सगळेच दुर्लक्ष करतात. राजकीय लाभ नसल्याने अपंगांचे प्रश्न हाताळले जात नाहीत. अपंगांसाठी राखीव ३ टक्के निधी कुठेही खर्च होत नसून येत्या काळात हा निधी जि. प. खर्च करणार नाही. तेथील सीईओंवर खटला भरून त्यांच्या खुच्र्या जप्त करण्यात येतील, असा इशारा कडू यांनी दिला.