वीज कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आला आहे. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी ही घोषणा केली आहे. उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. लॉकडाउन काळात वीज पुरवठा करण्यात, निसर्ग चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेली वीज यंत्रणा उभारण्यात, ठप्प झालेला मुंबईचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात उर्जा विभागाने मोठी भूमिका बजावली. हीच बाब लक्षात घेऊन उर्जा विभागाच्या कंपन्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बोनसची दिवाळी भेट जाहीर केली असल्याचं नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

वीज कर्मचाऱ्यांना जाहीर झालेल्या बोनसची रक्कम ही गेल्या वर्षी इतकी असणार आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १५ हजार तर विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक यांना प्रत्येकी ९ हजार रुपये बोनस म्हणून मिळाले होते. तसेच ते यावर्षीही मिळणार आहेत. विशेष बाब म्हणजे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणमध्ये भरतीसाठी पात्र ठरलेल्या ३६८ अभियंत्यांच्या नियुक्तीचेही आदेश दिले आहेत. त्यामुळे वर्षभरापासून नियुक्तीची वाट पाहणाऱ्या ३६८ जणांची दिवाळीही गोड झाली आहे.

 वीज कर्मचाऱ्यांना आवाहन

सर्व संघटना प्रतिनिधी व वीज कर्मचारी
आपल्या संपाच्या नोटीस बाबत आज दिनांक १३/११/२०२० रोजी मा. उर्जा मंत्री महोदय यांच्यासमवेत व प्रधान सचिव ऊर्जा तसेच तिन्ही कंपन्यांचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा करण्यात आली. वीज कंपन्यातील कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे परंपरेनुसार सानुग्रह अनुदान देण्याबाबत माननीय मंत्री महोदयांनी तत्वतः मान्यता दिलेली आहे. सानुग्रह अनुदानाच्या रकमेबाबतची घोषणा येत्या तीन ते चार दिवसांमध्ये व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून करण्यात येईल.मंत्रीमहोदयांनी सर्व संघटनांना असे आवाहन केले आहे की दीपावलीच्या उत्साही वातावरणामध्ये सर्व कर्मचारी संघटनांनी असे कुठलेही कृत्य करू नये ज्यामुळे वीज ग्राहकांना त्रास होईल.

सर्व संघटनांच्या प्रतिनिधींना मंत्री महोदयांनी केलेल्या आवाहनानुसार विनंती करण्यात येते की त्यांनी नियोजित संप रद्द करून प्रशासनास औद्योगिक शांतता कायम ठेवण्यासाठी सहकार्य करावे. आपणा सर्वांना दीपावलीच्या मनापासुन खुप खुप शुभेच्छा.