सक्तवसुली संचालनालयाने आज शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. परदेशी चलन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणाच्या आरोपामध्ये जाधव यांना समन्स पाठवण्यात आल्याचं ईडीने स्पष्ट केलं आहे. याचा पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते किरीट सोमय्यांनी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. प्रसारमाध्यमांसाठी जारी केलेल्या व्हिडीओमधून या प्रकरणामध्ये अगदी ठाकरेंची चौकशी होणार असं सोमय्या म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कालच पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सोमय्या यांनी महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्या हत्येप्रकरणी गंभीर आरोप केले होते. यावेळी हेमंत करकरे यांची हत्या कोणी केली? असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संबंधित व्यावसायिकांचे हेमंत करकरे यांच्या हत्येशी संबंधित लोकांशी संबंध असल्याचा गंभीर सोमय्यांनी केलेला. याच उद्योजकाच्या नावाचा खुलासा आज सोमय्यांनी केलाय.

“यशवंत जाधव यांची ईडीकडून चौकशी सुरु झाली आहे. भ्रष्टाचाराच्या कोट्यावधी रुपयांचं मनी लॉण्ड्रींग केलं. प्रधान डिलर्सचा शेअर एक रुपयाचा ५०० रुपयात विकला. हे कोट्यावधी रुपये स्वत:च्या खात्यात घेऊन दुबईला पाठवले, मोठी इस्टेट उभी केली,” असं सोमय्या जाधव यांच्यासंदर्भातील दावे करताना म्हणाले आहेत. तसेच पुढे बोलताना, “त्याचबरोबरच (जाधव यांनी) बुलेटप्रुफ जॅकेट घोटाळा, बिमल अग्रवालसोबत पार्टनरशीप केली. या बिमल अग्रवाल यांचे लाभार्थी श्रीधर पाटणकर. पाटणकर हे उद्धव ठाकरेंचे मेव्हणे. पाटणकरांचे पार्टनर ठाकरे या सगळ्यांची चौकशी होणार,” असं म्हणत सोमय्यांनी या प्रकरणाचे धागेदोरे ठाकरे कुटुंबापर्यंत जात असल्याचं सुचित केलंय.

पुण्यात काय म्हणाले होते सोमय्या?
मंगळवारी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सोमय्यांनी, “मी फार जबाबदारीने जाणीवपूर्वक सांगतोय की नवाब मलिक यांचे संबंध दाऊद गँगपर्यंत पोहचू शकतात, तर उद्धव ठाकरे यांच्या भागिदारांचे संबंध कसाबपर्यंत आहेत. त्यांचे संबंध कसाबचं कटकारस्थान करणाऱ्या लोकांपर्यंत आहेत. उद्धव ठाकरे, ठाकरे परिवार यांच्याशी व्यावसायिक संबंध असणाऱ्यांचा संबंध हेमंत करकरे यांची हत्या करणाऱ्यांशी आहे,” असा आरोप केला होता.

“हेमंत करकरे यांची हत्या दोन कारणांनी झाली. ही हत्या कसाबच्या सहकाऱ्यांनी, पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी केली. मात्र, हेमंत करकरे यांचा मृत्यू बुलेट प्रुफ जॅकेट नकली असल्याने झाला. बुलेटप्रुफ जॅकेट बोगस असल्याने हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला. त्या बुलेटप्रुफ जॅकेटचा पुरवठा विमल अग्रवाल याने केला होता. त्याची चौकशी झाली, कमिट्या नेमल्या गेल्या. विमल अग्रवालला अटक झाली,” असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.

“ज्या विमल अग्रवालला बोगस बुलेटप्रुफ जॅकेटप्रकरणी अटक झाली त्याचं नाव यशवंत जाधववर धाडी टाकल्या तेव्हा पुढे आलं होतं. यशवंत जाधव उद्धव ठाकरे यांचे ‘उजवे हात’ आहेत. जाधवांनी एक हजार कोटी रुपयांची माया जमवली आहे,” असाही आरोप सोमय्या यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Enforcement directorate summons shivsena leader yashwant jadhav kirit somaiya comment scsg
First published on: 25-05-2022 at 12:02 IST