लाचलुचपत विभागाचे पथक मागावर असल्याचे लक्षात येताच महापालिकेच्या शाखा अभियंत्याने बांधकाम परवान्यासाठी ३० हजाराची लाच घेण्याचे टाळले. मात्र लाच मागणी केल्याचे पडताळणीमध्ये स्पष्ट झाल्याने मंगळवारी अभियंत्याच्या विरोधात कुपवाडच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा >>> : किरकोळ वादातून पत्नीची हत्या ; आरोपी फरार
महापालिकेच्या नगररचना विभागामध्ये शाखा अभियंता म्हणून कार्यरत असणारे अल्ताफ मकबूल मकानदार यांच्याविरुध्द तीस हजाराची लाच मागणी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदाराकडे बांधकाम परवान्यासाठी ४५ हजाराची मागणी केली होती. चर्चेअंती ४० हजार ठरले. मंगळवारी यापैकी ३० हजार रुपये देण्यासाठी तक्रारदार गेले होते. यावेळी लाचलुचपत विभागाने सापळा लावला होता. मात्र कारवाईची शक्यता लक्षात येताच अभियंत्याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. पडताळणीत लाच मागणी झाल्याचे स्पष्ट झाल्याने अभियंत्याविरुध्द कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
