पॅरासिलिंगच्या बोटवरुन समुद्रात पडल्यामुळे एका ३२ वर्षीय इंजिनिअरचा मृत्यू झाला. कोकणात मालवणच्या समुद्र किनाऱ्याजवळ रविवारी दुपारी ही दुर्देवी घटना घडली. अझर अन्सारी असे मृत तरुणाचे नाव असून, तो पत्नीसोबत सुट्टयांचा आनंद लुटण्यासाठी कोकणात आला होता. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

नेमकं काय घडलं?
अझरची पॅरासिलिंगची फेरी पूर्ण झाली होती. तो बोटीच्या डेकवर उभा असताना समुद्रात पडला अशी माहिती त्याच्या पत्नीने पोलिसांना दिली. अझर अन्सारी समुद्रात पडला, त्यावेळी त्याच्याकडे लाईफ जॅकेट नव्हते असे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. अझर समुद्रात पडल्यानंतर बोटीवर पॅरासिलिंगचा स्टाफ आणि अन्य पर्यटकांनी समुद्रात उडी मारली व अझरला बाहेर काढले.

ही दुर्घटना घडली त्यावेळी बोट किनाऱ्यापासून बरीच दूर होती. अझर रुग्णालयाच्या वाटेवर असताना त्याचा मृत्यू झाला. बोटीवर त्याला व्यवस्थित प्रथमोपचार मिळाले नाहीत. अझरची पत्नी हानीबी सुद्धा इंजिनिअर आह. पॅरासिलिंगचा राऊंड पूर्ण केल्यानंतर अझर बोटीवर उभा होता. त्यावेळी अन्य पर्यटक सुद्धा त्यांचा नंबर येण्याची वाट पाहत होते.

अझर बोटीच्या डेकवर उभा असताना त्याचा तोल गेला व तो समुद्रात पडला. मागच्या तीन आठवडयातील ही तिसरी अशी घटना आहे. या घटनेमुळे साहसी खेळ खेळणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मागच्यावर्षी मुरुड-जंजीरा बीचवर पॅरासिलिंग करताना पुण्यातील अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला होता. अझर आणि त्याची पत्नी सर्वप्रथम गोव्याला गेले तिथून ते कोकणात मालवणमध्ये आले होते.