scorecardresearch

कास पठारावर ‘नाईट जंगल सफारी’ चा वाद ; पर्यावरणतज्ज्ञांचा विरोध तर स्थानिकांचा पाठिंबा

कास भांबवली तापोळा महाबळेश्वर पाटण सदाहरित जंगलाने व्यापलेला परिसर आहे. या परिसरात फक्त तीन महिने पर्यटक येतात.

विश्वास पवार, लोकसत्ता 

वाई : सातारा वनविभागाने कास पठारावर नव्याने नाईट जंगल सफारी सुरू केली आहे .मात्र कास पठारावरील रात्र जंगल सफारी (नाईट जंगल सफारी) सुरू  होण्यापूर्वीच वादात सापडली आहे. कास पठारावरील वन्यजीव आणि जैवसंपदा नष्ट होण्याची भीती व्यक्त करत साताऱ्यातील प्राणिमित्र, पर्यावरणवादी आणि सामाजिक  चळवळीतील कार्यकर्त्यांनी या सफारीला विरोध सुरू विरोध केला आहे. याशिवाय राष्ट्रीय हरित लवादाच्या न्यायालयात आव्हान देण्याची तयारीही सुरू केली आहे. तर स्थानिकांनी सफारी बंद करण्यास उपजीविकेचे कारण सांगत हरकत घेतली आहे.   

कास पठारावर जैवविविधता आहे.  त्यावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणाऱ्या विविध प्रकारच्या रानफुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. कास पठार मुख्य भाग म्हणजे राखीव वन पठाराचा भाग बेसाल्ट खडका पासून बनलेला असून मातीच्या पातळ आवरणापासून झाकला गेलेला आहे.  कास पठाराचे क्षेत्रफळ अंदाजे १० चौरस किमी मध्ये  २८०फुलांच्या प्रजाती, या व्यतिरिक्त वेली, वनस्पती झुडपे,त्याच्या इतर प्रजाती मिळून फक्त ऑगस्ट ते ऑक्टोबर याच महिन्यात ८५० प्रजाती आढळतात.  येथे सुमारे ५९ जातींचे सरिसृप (सरपटणारे प्राणी) आढळतात. कास भांबवली तापोळा महाबळेश्वर पाटण सदाहरित जंगलाने व्यापलेला परिसर आहे. या परिसरात फक्त तीन महिने पर्यटक येतात. वर्षभर पर्यटन सुरू करण्यासाठी हा एक प्रयोग असल्याचे कास पठार कार्यकारी समितीने म्हटले आहे. 

सातारा वनविभागाने कास पठार आणि आणि त्यावरील दहा चौरस किलोमीटर परिसरात असणाऱ्या जंगलात दोन वाहनांच्या माध्यमातून नाईट जंगल सफारी सुरू करण्याचा निर्णय घेतला. या परिसरात होत असणाऱ्या शिकारी आणि जंगल परिसरातील मानवी अतिक्रमण, हस्तक्षेप रोखण्यासाठी आपल्याकडे  अपुरे मनुष्यबळ असल्याने त्यानिमित्ताने रात्र गस्त होईल याबरोबरच नाईट जंगल सफारी होईल म्हणून या रात्र गस्तीच्या कार्यवाहीसाठी हा मुद्दा पुढे करण्यात आला आहे. या परिसरातील हॉटेल व्यावसायिकांचे हितसंबंधाांमुळे ही सफारी सुरु होत असल्याचा आरोप होतो आहे. मुळात  या जंगल सफारीतील  नेमके पर्यटन काय हे सांगण्यास वनविभाग असमर्थ ठरला आहे. या जगलं सफारी गाडय़ातून जाणारे पर्यटक फक्त मुख्य रस्त्यावरूनच फिरवले जाणार आहेत. त्यामुळे ती वाहने सोडून कोणत्याही नैसर्गिक व जंगली भागात जाण्याचा प्रश्नच येत नाही असा मुद्दाही पुढे करण्यात आला आहे. आठ जणांच्या एका वेळच्या सफारीसाठी चार हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.  सायंकाळी सात व रात्री दहा वाजता सातारा वनविभागाच्या कार्यालयातून नाईट जंगल सफारी वेबसाइटवर बुकिंग केलेल्याना जाता येणार आहे. या नाईट जंगल सफारी ला विरोध करत साताऱ्यातील पर्यावरण व वन्य प्रेमींनी वनविभागाकडे लेखी तक्रार केली आहे.

जंगलात न वापरलेल्या रस्त्यावर आणि गाडी फिरवण्याचा उद्देश नसून अस्तित्वातील रस्तेच त्यासाठी वापरले जाणार आहेत. या रस्त्यांवरच गाडय़ा फिरवल्या जाणार आहेत. त्यामुळे या जंगली परिसरात होत असणारा मानवी हस्तक्षेप, अतिक्रमण, घुसखोरी, शिकार, वणवा लावणे  आदींचा जंगलातील वावर रोखणे हाच उद्देश आहे.  

 – महादेव मोहिते , उपवनसंरक्षक, सातारा

भारतात काही ठिकाणी सुरू असणाऱ्या नाईट जंगल सफारी हे एक थोतांड आहे. याला वन कायद्यामध्येसुद्धा कायदेशीर आधार नाही. त्यासाठी कोणतेही मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. याला कोणाच्या तरी डोक्यात आलेले जाणीवपूर्वक खूळ आहे असेच म्हटले पाहिजे. निसर्गविघातक परिणामांची जाणीव असूनसुद्धा सोईस्कररीत्या त्याकडे दुर्लक्ष करून कोणाच्या तरी दबावाखाली अधिकाऱ्यांकडून हा प्रकार सुरू आहे. 

सुनील भोईटे, प्राणिमित्र, सातारा

कास, सातारा, जावली, महादरे जंगल परिसरात लागलेले सगळे वणवे कास कार्यकारी समितीच्या कार्यकर्त्यांनी विझवले आहेत. वन विभागाच्या सहकार्याने  जंगल सफारी सुरू केल्याने स्थानिक तरुणांना रोजगार मिळू  लागला आहे.

 –सोमनाथ जाधव, माजी अध्यक्ष, कास पठार कार्यकारी समिती. कासची  ताडोबा, राधानगरी, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांशी तुलना होऊ शकत नाही. कास पठार परिसर हा अतिसंवेदनशील क्षेत्र आहे.रात्रीची कास परिसरात सफारी सुरू केली आहे. हा निर्णय  दुर्दैवी असून या जंगल सफारीमुळे पर्यावरणाच्या जैव संपदेवर मोठा परिणाम होऊ शकतो. कास परिसर हा रात्रीच्या वेळी  संपूर्ण मोकळा असायला हवा. वनविभागाच्या पथकाला फिरण्यास हरकत नाही, मात्र नाईट सफरीला विरोध आहे.कास परिसर हा अतिशय सूक्ष्म अशा वनस्पती, प्राणी, कीटक यांचा एक नैसर्गिक आविष्कार आहे, त्याची जपणूक व्हायलाच हवी.  – डॉ संदीप गजानन श्रोत्री, संस्थापक, रानवाटा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन  मंडळ, सातारा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Environmentalists oppose locals in support for night jungle safari on kaas plateau zws