अमेरिकेतील एपस्टीन फाईल्स या १९ डिसेंबर रोजी तिथल्या संसदेत खुल्या होणार आहेत. त्यातून समोर येणारी माहिती ही जगाला हादरवणारी असेल, भारताच्या राजकारणावरही त्याचा मोठा परिणाम होईल असा दावा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. एपस्टीन नावाच्या व्यक्तीने जगातील अनेक लोकांना अल्पवयीन मुली पुरवल्यात, त्यामध्ये भारतातील काही जणांचा समावेश आहे. त्यामुळे देशाचा पंतप्रधान बदलला जाईल असा आपला तर्क असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

एपीस्टीन फाईल्समध्ये भारतीय खासदारांची नावं

देशातील पंतप्रधान बदलला जाईल आणि नागपूरशी संबंधित व्यक्ती पंतप्रधानपदावर बसेल असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी या आधीही केला. आताही ते त्यांच्या दाव्यावर ठाम आहेत. मोदींचे परराष्ट्र धोरण हे पूर्णपणे अयशस्वी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. एपीस्टन फाईल्समध्ये भारतातील काही आजी माजी खासदारांचीही नावे असल्याची चर्चा आहे असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. जेफ्री एपस्टीन नावाच्या व्यक्तीने जगातील अनेक बड्या लोकांना अल्पवयीन मुली पुरवल्यात. आता त्याने आत्महत्या केल्याची बातमी आली. मात्र त्याने आत्महत्या केली नाही, त्याची हत्या झाली असण्याचा संशय आहे असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. आपण जे काही बोलत आहोत ते अमेरिकेच्या संसदेत्या वेबसाईटवर उपलब्ध असल्याचा दावा चव्हाणांनी केला. एबीपी माझाशी त्यांनी काही वेळापूर्वी संवाद साधला त्यात त्यांनी हा दावा केला आहे.

एपस्टीन कांड काय आहे?

अमेरिकेतील एपस्टीन कांड काय आहे याची माहिती देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “जेफ्री एपस्टीनने १९९५ पासून अल्पवयीन मुलींच्या मदतीने मोठ्या राजकारण्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही मुलींच्या तक्रारीवरून त्याला १३ महिन्यांची शिक्षा झाली. नंतर त्याला पुन्हा एकदा तुरुंगात ठेवण्यात आलं. त्याने जे काय केलं ते जगासमोर येऊ नये, त्या राजकारण्यांची नावं जगासमोर येऊ नयेत म्हणून त्याच्यावर दबाव होता. ऑगस्ट २०१९ मध्ये न्यूयॉर्कच्या हाय सिक्युरिटी प्रिझनमध्ये त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. पण त्यावर कुणाचाही विश्वास नव्हता.

डोनाल्ड ट्रम्प यांचंही नाव समोर आलं आहे-चव्हाण

हाय प्रिझन सिक्युरिटीमध्ये त्याला दोर कुठून मिळाला, त्याने आत्महत्या कशी केली असे प्रश्न विचारण्यात आले. पोस्टमॉर्टम केल्यानंतर त्याचा गळा दाबून हत्या केल्याचा संशय काही जणांनी व्यक्त केला असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “आपला वापर करून मोठमोठ्या राजकारण्यांना अडकवण्यात आलं, आपले लैंगिक शोषण करण्यात आल्याच्या तक्रारी शंभरच्या वर मुलींनी केल्या. त्यानंतर हे प्रकरण पुढे आलं. आता अमेरिकेच्या संसदेमध्ये ही बाब खूपच गंभीरपणे घेण्यात आली आहे. त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचेही नाव आलं आहे. माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन, बिल गेट्स यांचेही नाव आलं आहे. बिल गेट्स यांनी ते मान्यही केलं आहे. इंग्लंडचे युवराज प्रिन्स अँड्र्यू यांचेही नाव आलं. पण त्यांनी आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंट केली.”