अवघ्या दहा दिवसांत नाशिक जिल्ह्यास सलग दुसऱ्यांदा अवकाळी पावसाचा सामना करावा लागला. सोमवारी सायंकाळी वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह नाशिक व धुळे जिल्ह्यातील काही भागांत पाऊस झाला. अवकाळी पावसाने द्राक्ष बागांसह गहू, हरभरा व कांदा पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात सोमवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. साडेचार वाजेच्या सुमारास इगतपुरी तालुक्यात पावसाला सुरुवात झाली. साधारणत: अर्धा तास अवकाळी पावसाने या भागास झोडपून काढले. त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाचे स्वरूप रिमझिम होते. येवला, ओझर, पिंपळगाव बसवंत या परिसरात पावसाने हजेरी लावली. नाशिक शहरातील अंबड, राणेनगर, नाशिक रोड अशा काही भागांतही सायंकाळी पावसाने सर्वसामान्यांची तारांबळ उडवून दिली. धुळे शहर व शिरपूर तालुक्यात सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. दहा दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला होता. अवघ्या काही दिवसांत पुन्हा तीच स्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू असताना हे संकट कोसळल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाचे पाणी घडांमध्ये साठून मण्यांना तडे जाऊ शकतात, तसेच बुरशीही लागू शकते. या पावसाचा फटका तयार झालेल्या गहू, हरभरा पिकांसोबत कांद्यालाही बसू शकतो, असे या क्षेत्रातील जाणकारांकडून सांगण्यात आले.