scorecardresearch

जिल्ह्यात महावितरणच्या १३२४ ग्राहकांच्या बिलांत त्रुटी; दुरुस्तीनंतर ३६ लाखांच्या वीजबिल थकबाकीचा भरणा

महावितरणच्या नगर जिल्ह्यातील कार्यालयातून कृषीपंप व इतर वीज देयकांच्या दुरुस्तीसाठी एकाच दिवशी आयोजित केलेल्या शिबिरातून प्राप्त तक्रारींपैकी १ हजार १४७ ग्राहकांची वीजबिले जागेवरच दुरुस्त करून देण्यात आली.

महावितरणने आयोजित केलेल्या शिबिरात निमगाव येथील शेतकरी भाऊसाहेब कातोरे यांनी चार कृषी पंपाच्या वीजबिलाच्या दुरुस्तीनंतर थकबाकीची एक लाख २८ हजार रुपयांची रक्कम जमा केली.

नगर : महावितरणच्या नगर जिल्ह्यातील कार्यालयातून कृषीपंप व इतर वीज देयकांच्या दुरुस्तीसाठी एकाच दिवशी आयोजित केलेल्या शिबिरातून प्राप्त तक्रारींपैकी १ हजार १४७ ग्राहकांची वीजबिले जागेवरच दुरुस्त करून देण्यात आली. कृषीपंप व इतर वर्गवारीच्या वीज देयकाच्या थकबाकीमधील ३६ लाख ४८ हजार रुपयांचा भरणाही ग्राहकांनी शिबिरात केला.

कृषी ग्राहकांसाठी राज्य शासनाने सर्व समावेशक कृषिपंप वीज जोडणी धोरण-२०२० जाहीर केले आहे. मात्र या योजनेत बिले भरतांना ग्राहकांच्या शंकेचे निरसन व्हावे व बिले दुरुस्त करून देण्याची मागणी महावितरणला प्राप्त झाली होती. तसेच विलासराव देशमुख अभय योजनेची माहिती ग्राहकांना देण्यासाठी ही शिबिरे आयोजिण्यात आली होती. नगर मंडळातील नगर ग्रामीण, नगर शहर, कर्जत, संगमनेर व श्रीरामपूर विभागाअंतर्गत उपविभागामध्ये वीज बिल दुरुस्ती शिबिरे काल, मंगळवारी आयोजिण्यात आली होती, यामध्ये ग्राहकांना कृषी व इतर वर्गवारीची बिले जागेवरच दुरुस्त करण्यात आली. 

त्यामध्ये नगर शहर विभागात प्राप्त २९७ ग्राहकांच्या तक्रारीपैकी २३६ तक्रारींचे निराकरण करण्यात आले. ग्राहकांनी ९५ हजार रुपयांचा भरणाही शिबिरातून केला. नगर ग्रामीण विभागातील प्राप्त ३८५ तक्रारीपैकी ३३८ ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण झाले असून या ग्राहकांनी या वेळी ९ लाख १८ हजार रुपयांचा भरणा केला. कर्जत विभागातील २४९ तक्रारीपैकी २१० ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात आले. या ग्राहकांनी ८ लाख ५० हजार रुपये थकबाकीपोटी जमा केले.

संगमनेर विभागातील ३१४ पैकी २८९ तक्रारींचे निराकरण झाले. ग्राहकांनी या वेळी १३ लाख  ३ हजार रुपयांचा भरणाही केला. श्रीरामपूर विभागात ७९ प्राप्त तक्रारींपैकी ७४ ग्राहकांचे निराकरण करण्यात आले. या ग्राहकांनी ४ लाख ८२ हजार रुपयांचा भरणा केला. नगर मंडळात कृषी व इतर वर्गवारीतील १ हजार ३२४ ग्राहकांनी सहभाग नोंदविला. त्यात १ हजार १४७ तक्रारींचे निराकरण करण्यात आले. या ग्राहकांनी शिबिरात ३६ लाख ४८ हजार रुपयांचा भरणाही केला. शिबिरासाठी नगरचे अधीक्षक अभियंता सुनील काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते, अभियंते, अधिकारी, कर्मचारी व जनमित्र यांनी परिश्रम घेतले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Error in bills msedcl customers payment electricity bill arrears repairs ysh

ताज्या बातम्या