शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनाच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी खासदार फुटीवर भाष्य केलंच. शिवाय त्यांनी भाजपाच्या फोडाफोडीवरही जोरदार टीका केली. काँग्रेसनेही फोडाफोडी केली पण आपला माणूस फोडून त्यांनी कधीही मुख्यमंत्री केला नाही असंही भाष्य उद्धव ठाकरेंनी केलं. उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या २०२२ च्या निर्णयावर जोरदार टीका केली आणि भाषणात काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही असंही म्हटलं आहे.
काँग्रेसबाबत काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“काँग्रेसचा विषय काढलाच आहे तर आता मी स्पष्टच सांगतो, महाराष्ट्राने त्यांचा अश्वमेध अडवला तेव्हा काँग्रेस तुम्हाला हवी होतीच ना? आज एकदम तुम्हाला वाटू लागलं की शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होईल? शिवसेना विलीन होण्यासाठी आलेली नाही, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जन्माला आली आहे. तुम्हाला आता विषय काढलाच आहेत तर स्पष्ट सांगतोय, काँग्रेसनेही आपल्याला छळलंच. आपलं अर्ध्याहून अधिक आयुष्य हे काँग्रेसबरोबर राजकीय वैर करण्यात गेलं आहे. अगदी टोकाचं वैर, तिखट टीका आपण केली आहे. भाजपा सोबत असल्याने ही टीका आपण केली. बाबरी पाडल्यानंतर भाजपाचे लोक पळून गेले होते तेव्हा शिवसेना प्रमुख उभे राहिले होते. कुणासाठी उभे राहिले होते? सगळं तुम्ही विसरुन गेलात.” असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी भाजपाला विचारला आहे.
काँग्रेसनेही आपली माणसं फोडली, पण कुणाला मुख्यमंत्री केलं नाही-उद्धव ठाकरे
काँग्रेसने सुद्धा आपली माणसं फोडली, काही माणसं आपण काढून टाकली होती ती त्यांनी घेतली. पण कधीही काँग्रेसने त्यांच्यापैकी कुणालाही मुख्यमंत्री केला नव्हता. काँग्रेसने कधीही आपल्याला असं छळलं नव्हतं. काँग्रेसने मातोश्रीवर डोळे हावरटासारखे उगारुन बघितलं नव्हतं. आज भाजपा शिवसेना मुळासकट उखडून टाकायला निघाला आहे. मातोश्रीला बदनाम करायला निघाला आहे. हा फरक आहे, ही संस्कृती आहे. भले काँग्रेस असेल ती असेल पण तुमच्या हिंदुत्वापेक्षा काँग्रेस त्यांच्या शब्दाला जागली आहे. राजकारण इतकं गढूळ कधीच झालं नव्हतं. राजकारणा दोन माणसं इकडची तिकडे गेली, चार गेली ठीक आहे. पण पक्षच्या पक्षच तुम्ही संपवायला निघाला आहात. ज्या पक्षाने तुमचं बोट धरलं नसतं तुम्ही तिथल्या तिथे गाडले गेला असातात त्यांना तुम्ही आज संपवायला निघालात? असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी विचारला. एका बाजूने आणि सुप्रीम कोर्ट आणि कायदा मंत्री हे बॅडमिंटन खेळत आहेत आणि मधे आमचं शटलकॉक झालं आहे. शिवसेना हवी आहे की नको? हा विचार महाराष्ट्राने केला पाहिजे.
