राज्यात एमआयएमचे १२५ नगरसेवक निवडून आले आहेत. एमआयएमने महानगरपालिका निवडणुकीत मुसंडी मारली आहे. छत्रपती संभाजी नगर शहरात या पक्षाचे सर्वाधिक ३३ नगरसेवक निवडून आले आहेत. “एमआयएमची जागा काँग्रेसने घेतली”, अशी खोचक टीका माजी मुख्यमंत्री व भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. नांदेडमध्ये एमआयएमचे १४ तर काँग्रेसचे १० नगरसेवक निवडून आले आहेत. नांदेडमध्ये ८१ जागांपैकी ४५ जागांवर भाजपाचे नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांनी कमळ फुलवले आहे.

नांदेडमध्ये शिंदेसेनेला फक्त चार जागा

नांदेडमधील जनतेने पहिल्यांदाच महानगरपालिका भाजपाच्या हातात सोपवल्याचे सुतोवाच अशोक चव्हाण यांनी केले. दरम्यान, नांदेडमध्ये शिंदेसेनेला फक्त चार जागांवर यश मिळवता आले. भाजपा व शिवसेना नांदेडमध्ये स्वतंत्र लढले होते. युती झाली असती तर शिंदेसेनेला त्रास झाला नसता, असा निर्वाळा अशोक चव्हाण यांनी दिला.

“निवडणुका हा वेगळा विषय”

अशोक चव्हाण म्हणाले, “गेल्या ४० वर्षांपासून मी राज्याचं, जिल्ह्याचं नेतृत्व करतोय. परंतु, निवडणुका हा वेगळाच विषय असतो. लोकांना राजकीय स्थैर्य लागत असतं. केंद्र आणि राज्यात सरकार भाजपाचं आहे. त्या सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याला अधिकचा पैसा मिळेल, विकास कामांना चालना मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणातून जे काही विषय स्पष्ट केले आहेत, त्या अनुषंगाने पुढची वाटचाल करता येईल. तो विषय लोकांच्या मनात होता. त्यामुळे त्यांनी भाजपाच्या बाजूने कौल दिला आहे.”

“काँग्रेसची स्पेस आता एमआयएमने घेतली”

नांदेडमध्ये काँग्रेसला १० तर एमआयएमला १४ जागा मिळाल्या याबद्दल अशोक चव्हाणांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, “काँग्रेसची स्पेस कोणीतरी घेणारच होतं. काँग्रेस काही कामगिरी करेल अशी ज्या लोकांना अपेक्षा होती, त्यांना कळलं की, काँग्रेस आता विरोधी पक्ष म्हणूनही ताकदीने उतरू शकत नाही. त्याबद्दल लोकांना प्रचिती आली. त्यामुळे त्यांनी पर्याय म्हणून एमआयएमला निवडून दिलं. अल्पसंख्याक समुदायातील लोकांना काँग्रेसवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे काँग्रेसची स्पेस आता एमआयएमने घेतली आहे. ती स्पेस राष्ट्रवादी घेईल असं वाटलं होतं पण तसं झालं नाही.”

छत्रपती संभाजी नगरमध्ये MIM ला अभूतपूर्व यश

सोलापूर महापालिका निवडणुकीत एमआयएमने यश मिळवलं आहे. सोलापूर मनपा निवडणुकीत ८ जागांवर एमआयएमचे उमेदवार विजयी झाले. प्रभाग १४ आणि प्रभाग २० या दोन्ही प्रभागांतील आठही उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे सोलापूर महापालिकेत भाजपानंतर एमआयएम दुसरा मोठा पक्ष ठरला आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजी नगरमध्ये सर्वाधिक ३३ उमेदवार विजयी झाले आहेत.