नासाची नोकरी सोडून नाशिकला परतले; शेतकऱ्यांसाठी बनवलं आधुनिक हवामान केंद्र

नाशिकच्या भूमिपुत्राने शेतीच्या विकासात उचलला अमूल्य वाटा… नाशिकमध्ये ४० कार्यान्वित, ४०० केंद्रांसाठी मागणी

Ex-NASA scientist, Parag Narvekar
हवामानाची पूर्वसूचना मिळाल्यास हे नुकसान कमी करता येऊ शकतं. ही अडचण हेरून अमेरिकेतील ‘नासा’ संस्थेतून भारतात परतलेले डॉ. पराग नार्वेकर यांच्या सोबतीने सह्याद्री फार्मसने शेतकऱ्यांना परवडतील, असे अत्याधुनिक स्वयंचलित हवामान केंद्र विकसित केले.

-विशेष प्रतिनिधी

नाशिक : निसर्गाच्या लहरीपणाचे शेतीवर विपरित परिणाम होतात. कित्येकदा हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो. हवामानाची पूर्वसूचना मिळाल्यास हे नुकसान कमी करता येऊ शकतं. ही अडचण हेरून अमेरिकेतील ‘नासा’ संस्थेतून भारतात परतलेले डॉ. पराग नार्वेकर यांच्या सोबतीने सह्याद्री फार्मसने शेतकऱ्यांना परवडतील, असे अत्याधुनिक स्वयंचलित हवामान केंद्र विकसित केले आहे. त्याची उपयोग लक्षात आल्यामुळे शेतकऱ्यांचा ही केंद्र बसविण्याकडे कल वाढला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४० केंद्र कार्यान्वित झाली असून, ४०० शेतकऱ्यांनी यासाठी मागणी नोंदविली आहे.

अमेरिकेच्या नासा संस्थेत उपग्रह आणि शेतीतील सेन्सर आधारित तंत्रज्ञान यावर संशोधन करणारे पराग नार्वेकर हे आता भारतीय शेतकऱ्यांसाठी काम करीत आहेत. सेंन्सरटिक्स या कंपनीचे ते कार्यकारी अध्यक्ष आहेत. त्यांच्या संकल्पनेला स‘ह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीचं पाठबळ मिळालं. माती, पाणी, पीक व्यवस्थापन व पीक विमा यांच्या अनुषंगाने हवामानाच्या विविध निकषांची माहिती उपलब्ध होऊन शेती अधिक काटेकोर, अचूक करण्यास मदत मिळणार आहे. सह्याद्रीने एका खासगी कंपनीसोबत करार करून शेतकऱ्यांच्या शेतात स्वयंचलित हवामान केंद्रं उभारणी, संगणकीय प्रणाली विकसित करणे व त्याआधारे सल्ला, मार्गदर्शन असा उपक्रम सुरू केला. अत्याधुनिक प्रणालीद्वारे काटेकोर शेतीवर लक्ष दिले गेले. याद्वारे उत्पादन खर्च कमी करून प्रभावी व अचूक शेती व्यवस्थापन, गुणवत्तापूर्ण उत्पादन साध्य करता येते. नंतर सह्याद्री कंपनीने एक पाऊल पुढे टाकत स्वत:ची सहयोगी कंपनी सुरू केली.

डॉ. पराग नार्वेकर यांच्या सोबतीने सह्याद्री फार्मसने शेतकऱ्यांना परवडतील, असे अत्याधुनिक स्वयंचलित हवामान केंद्र विकसित केले आहे.

आधीच्या प्रकल्पात परदेशातील कंपनीकडून हवामान केंद्र आयात करावी लागायची. प्रति केंद्राची किंमत एक लाख ६० हजार रुपये होती. सामान्य शेतकऱ्याला ते परवडणारं नव्हतं. त्यामुळे आम्हीच कंपनी स्थापन करून १२ हजारापासून ६० हजार रुपये या किंमतीत ती उपलब्ध केल्याचे सह्याद्री फार्मसचे प्रमुख विलास शिंदे यांनी सांगितलं. ५०० केंद्रांचे लक्ष्य निश्चित करून काम केले जात आहे. सह्याद्रीचे सदस्य नसलेल्या शेतकऱ्यांनाही मागणीनुसार ही केंद्रे दिली जाणार असल्याचे ते म्हणाले. पीक विमा भरपाई मिळविण्यासाठी ही केंद्र महत्वाची ठरतील. संबंधित शेतातील पर्जन्यमान व तत्सम माहिती उपलब्ध होईल. द्राक्ष बागेत केंद्र उभारणारे मोहाडी येथील गणेश कदम त्याचे फायदे सांगतात. झाडांच्या मुळांना पाण्याची गरज भासली किंवा बागेत एखाद्याा रोगाचा प्रादुर्भाव होणार असेल तर त्याची पूर्वसूचना मिळते. तापमान, आद्र्रता आदी बाबी कळून येतात. त्यानुसार पूर्वनियोजन करता येते. मुख्य म्हणजे मालाची गुणवत्ता वाढते. सुमारे ३० टक्के फवारण्या वाचवता येतात. एकूण हवामान अंदाज येतो असे त्यांनी नमूद केले. हवामान केंद्रातून वाऱ्याचा वेग, दिशा, सौर किरणे, वातावरणातील दाब, बाष्पीभवन, पर्जंन्यमान, पानांवरील ओलावा, आद्रर्ता, तापमान, मातीचे तापमान आदी माहिती शेती व्यवस्थापनास नवी दिशा देत आहे.

अत्याधुनिक व सामान्य शेतकऱ्याच्या आर्थिक आवाक्यात असतील, अशी तीन प्रकारची हवामान केंद्रांची निर्मिती करण्यात आली. ‘आयआयटी’ मुंबई येथून अभियंता झालेले व नासा (अमेरिका) या जगप्रसिद्ध संस्थेत सुमारे १२ वर्षे काम करणारे पराग नार्वेकर भारतात परतले. इस्त्रो, आयआयटी, अमेरिका कृषी विभाग यांच्यासोबत त्यांनी काही प्रकल्पांवर काम केले. त्यानंतर सेन्सरटिक्स कंपनी सुरू केली. आज हीच कंपनी सह्याद्रीची सहयोगी बनली आहे.

अमेरिकेच्या नासा संस्थेत उपग्रह आणि शेतीतील सेन्सर आधारित तंत्रज्ञान यावर संशोधन करणारे पराग नार्वेकर हे आता भारतीय शेतकऱ्यांसाठी काम करीत आहेत.

“मोहाडी येथे स्वयंचलीत हवामान केंद्रांची निर्मिती केली जात आहे. सेंसर वगळता उर्वरित ८० टक्क्यांहून अधिक उपकरणे स्थानिक पातळीवर तयार झाली आहेत. उच्च दर्जाचे पर्जंन्यमापक, सेंसर असे काही भागच अमेरिकेतील प्रसिद्ध कंपनीकडून आयात केले जातात. त्या कंपनीशी सहयोगी करार करण्यात आला. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राला (पुणे) हवामान केंद्रांकडून संकलित केली जाणारी माहिती पाठविली जाईल. शास्त्रज्ञांमार्फत त्याचे विश्लेषण होऊन स्थानिक स्तरासाठी अचूक ठरणारे पीक संरक्षण व व्यवस्थापन मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळेल. नाशिक जिल्ह्यात ४० हवामान केंद्र कार्यान्वित असून ४०० केंद्रांची मागणी प्राप्त झाली आहे”, अशी माहिती नार्वेकर यांनी या प्रकल्पाविषयी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ex nasa scientist parag narvekar developed sensors for farmers use of fertiliser irrigation improve produce bmh