नक्षलवाद्यांशी संबंध ठेवण्याच्या आरोपावरून चर्चेत आलेले गडचिरोली जिल्हय़ातील ‘प्राइममिनिस्टर फेलो’ महेश राऊत आणि त्याची मैत्रीण हर्षांली पोतदारच्या बचावासाठी टाटा समाज विज्ञान संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
जहाल नक्षलवादी नर्मदाला भेटण्यासाठी जात असताना राऊत व पोतदार यांना २२ जूनला पोलिसांनी गट्टा परिसरातून ताब्यात घेतले होते. त्यांच्यासोबत असलेल्या दोन नक्षलवाद्यांना अटक केल्यानंतर त्यांच्या जबाबातून समोर आलेल्या माहितीवरून पोलिसांनी त्याच दिवशी राऊत व पोतदार यांच्यावर गुन्हा दाखल केला. सध्या या दोघांची आलापल्लीच्या प्राणहिता मुख्यालयात रोज चौकशी सुरू आहे. हे दोघेही नक्षलवाद्यांसाठी काम करीत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. केंद्रातील ग्रामीण विकास मंत्रालयाने नेमणूक केलेला ‘प्राइम मिनिस्टर फेलो’च नक्षलवाद्यांसाठी काम करत असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली. आता या दोघांच्या बचावासाठी मुंबईतील टाटा समाज विज्ञान संस्थेचे माजी विद्यार्थी रिंगणात उतरले आहेत. याच संस्थेमधून शिक्षण घेतलेल्या महेश राऊतची फेलो म्हणून निवड करण्यात या संस्थेने पुढाकार घेतला होता. या संस्थेने देशभरासाठी एकूण १४३ फेलोंची निवड दोन वर्षांपूर्वी केली होती. आता तोच फेलो नक्षलवाद्यांशी संबंध ठेवून असल्याचे पोलिसांनी उघडकीस आणल्यानंतर या संस्थेच्या अधिकाऱ्यांनी स्वत: पुढे न येता माजी विद्यार्थ्यांना गडचिरोलीत पाठवले आहे. या विद्यार्थ्यांनी राऊत व पोतदार या दोघांना पोलिसांच्या कचाटय़ातून सहीसलामत बाहेर काढण्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाशी पत्रव्यवहार सुरू केला आहे. या दोघांना पोलीस नाहक त्रास देत आहेत, असे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांच्या या पत्रव्यवहाराची दखल घेत मंत्रालयाने गडचिरोलीच्या प्रशासनाकडून या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागविला आहे. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी पोलिसांची चौकशी होईपर्यंत महेश राऊतला या जिल्हय़ातून बाहेर पाठवण्यात यावे, असे पत्र मंत्रालयाला पाठवले आहे. राऊतच्या मदतीसाठी देशभरात काम करणाऱ्या फेलोंनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.
कबीर कला मंचशी संबंधांची कबुली
महेश राऊत व हर्षांली पोतदार या दोघांनी त्यांच्यावर झालेले आरोप नाकारले होते. चौकशीतसुद्धा या दोघांनी हीच भूमिका घेतली होती. आता मात्र हर्षांलीने कबीर कलामंचशी आपले संबंध होते, अशी कबुली पोलिसांजवळ दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या दोन वर्षांपासून पुण्यातील हा मंच पोलिसांच्या रडारवर आहे. या मंचच्या बचावासाठी स्थापन करण्यात आलेल्या संरक्षक समितीत आपला सहभाग होता, असे हर्षांलीने कबूल केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. हर्षांलीजवळ या मंचशी संबंधित पत्रके सापडली होती. या एकूण घडामोडींमुळे हे प्रकरण गंभीर झाले आहे.