ऑगस्टअखेर आणि सप्टेंबरमधील पूर्वा व उत्तरा नक्षत्रांतील पावसाने जिल्ह्यातील खरीप क्षेत्राला जबर तडाखा दिल्यानंतर आता पावसाळ्यातील शेवटच्या हस्त नक्षत्राच्या पावसाने आपल्या आगमनाच्या पहिल्याच रात्री मुसळधार बरसत सबंध जिल्ह्यात हाहाकार माजवला. या रौद्रावतारात ८५ पैकी ६५ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद करतानाच जनजीवन विस्कळीत केले. नद्या, नाले दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र जिल्ह्याने पाहिले. पूरस्थिती लक्षात घेता नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सप्टेंबरच्या पहिल्या तीन आठवड्यातील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पीक हानी आणि अन्य नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाकडून सोमवारी मदत-पुनर्वसन विभागाला सादर झाली होती. त्यानंतरच्या १८ तासांत नव्या नक्षत्राच्या पहिल्या पावसाने आणखी एक मोठा घाव घातल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांना सकाळीच घराबाहेर पडावे लागले. काही अतिवृष्टीग्रस्त भागात त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. नांदेड महानगरासह अनेक तालुक्यांतील पावसामुळे अनेक मार्ग ठप्प झाले. सुदैवाने दुपारपर्यंत कोठेही जिवित हानीची नोंद नव्हती, असे सांगण्यात आले.

नांदेड शहरात गोदावरी नदीपात्राची पातळी सोमवारीच वाढली होती. नंतरच्या सर्वदूर पावसामुळे नदीतील पाण्याचा खळखळाट शहरवासीयांनी अनुभवला. जिल्ह्यातील पैनगंगा, मन्याड, लेंडी, आसना आदी उपनद्यांनीही रौद्र रूप धारण केले. बहुसंख्य तालुक्यांतील अनेक शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्‍त झाल्याची माहिती ग्रामीण भागातून मिळाली. नदीकाठची अनेक गावे आणि तांड्यांमध्ये लोकांच्या घरात पाणी घुसल्याचेही वृत्त आहे. नांदेडमध्ये दुपारपर्यंत अनेक ठिकाणी पाणी साचले. पावसाचा मुक्काम आणखी दोन दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे.

बीड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा; मांजरा धरणाचे सर्व १८ दरवाजे उघडले!

लोहा, कंधार, मुखेड, नायगाव, बिलोली, धर्माबाद, हदगाव, भोकर, देगलूर आदी तालुक्यांतल्या ६५ महसूल मंडळांच्या क्षेत्रात २४ तासांमध्ये अतिवृष्टची झाली. काही मंडळांतील पावसाचे प्रमाण चार ते पाच इंच इतके होते. अतिवृष्टीची प्राथमिक माहिती मिळाल्यावर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जनतेला खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले.

मराठवाड्यात मुसळधार पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला!

भाजपाचे आमदार राम पाटील रातोळीकर यांच्याशी संपर्क साधला असता, २६-२७ सप्टेंबरच्या पावसाने संपूर्ण शेती उद्ध्वस्त झाल्याचे नमूद केले. शेतकर्‍यांनी आपल्या नुकसानीची माहिती पीक विमा कंपनीला तात्काळ कळवावी, असे आवाहन त्यांनी केले. शेवटच्या नक्षत्रातील पावसाने उरल्यासुरल्या पिकांची वाताहत करून टाकल्यानंतर सत्ताधारी तसेच विरोधी पक्षीय लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

पुरामुळे ४ लाख ३० हजार ६५८ हेक्टर क्षेत्रांत ३३ टक्क्यांच्या वर पीकहानी –

सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरात वाहून गेलेल्या मृत व्यक्‍तिंची संख्या १२ आहे. यंदाच्या पावसाळ्यात वीज पडून ५ तर पुरात वाहून मयत झालेल्यांची संख्या २८ असल्याचे सांगण्यात आले. जुलै ते सप्टेंबर २०२१ दरम्यान अतिवृष्टी व पुरामुळे ४ लाख ३० हजार ६५८ हेक्टर क्षेत्रांत ३३ टक्क्यांच्या वर पीकहानी झाली. बाधित शेतकर्‍यांची संख्या ६ लाख ८३ हजार असून शासनाच्या प्रचलित नियमाप्रमाणे नुकसानभरपाईसाठी २६५ कोटी रूपये लागतील, असे प्रशासनाने शासनाला कळविले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Excessive rainfall in 65 revenue circles in nanded district msr
First published on: 28-09-2021 at 18:19 IST