scorecardresearch

पानी कम बीअर!

बारमध्ये हमखास ऑर्डर केली जाणारी स्ट्राँग वा माइल्ड बीअर प्रत्यक्षात किती पाण्याची उधळपट्टी करून तयार केली जाते, याच्याशी तळीरामांचा सुतराम संबंध नसतो.

पानी कम बीअर!

बारमध्ये हमखास ऑर्डर केली जाणारी स्ट्राँग वा माइल्ड बीअर प्रत्यक्षात किती पाण्याची उधळपट्टी करून तयार केली जाते, याच्याशी तळीरामांचा सुतराम संबंध नसतो. मात्र, बीअर कंपन्यांना त्याचा बारकाईने विचार करावा लागतो. ज्या ठिकाणी पाण्याचे प्रमाण मुळातच कमी असेल तिथे हा उद्योग राबवणे म्हणजे कसोटीच. भरपूर पाणी रिचवणारी बीअर कमी पाण्यात तयार करता आली तर ते स्वागतार्हच असते. मात्र, असा प्रयोग सहसा होत नाही. कायम पाण्याची ओरड असलेल्या औरंगाबादेतील एका कंपनीने हा प्रयोग यशस्वी करत पानी कम बीअरची निर्मिती केली आहे!
एरवी एक लिटर बीअरची निर्मिती करण्यासाठी सहा ते आठ लिटर पाणी खर्च होते. परंतु औरंगाबादेतील वाळुंज औद्योगिक वसाहतीतील पाल्स ब्रेव्हरीज या कंपनीने फक्त पावणेचार लिटर पाण्यात एक लिटर बीअर तयार करण्याचा प्रयोग यशस्वी केला. विशेष म्हणजे पाण्याचा किती वापर झाला, किती पाणी बीअर निर्मितीसाठी लागले वगैरेच्या काटेकोर तपासणीसाठी या ठिकाणी पाणीमापन मीटरही आहेत. कंपनीमध्ये शुद्धीकरण तंत्रात बदल करताना ‘५ आर’ हे धोरण स्वीकारण्यात आले. रिप्लीनेस, रेडय़ुस, रिसायकल, रियूज व रिडिस्ट्रिब्युशन या शब्दांच्या भोवती हे धोरण ठरविले गेले. २००८मध्ये पाणीबचतीचे हे प्रयोग सुरू झाले. तेव्हा एक लिटर बीअरसाठी साधारण साडेपाच ते सहा लिटर पाणी लागायचे. पाण्याचा वापर त्यानंतर आठ टक्क्यांनी कमी करण्यात आला. शुद्धीकरण केलेले पाणी व अशुद्ध पाणी याची व्यवस्थाही बदलण्यात आली. ज्या पाण्याचा थेट बीअर निर्मितीशी संबंध येत नाही, ते अन्यत्र वापरण्यात आले. बाटल्या स्वच्छ करण्यासाठी काही वेळा पाश्चराइज करण्यात आल्या. पाण्याचा वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग केल्याने आता ३.४७ लिटर पाण्यात एक लिटर बीअर होत आहे. मोठमोठय़ा टाक्यांमध्ये बीअर निर्मितीची प्रक्रिया अधिक पाणीखाऊ आहे, असे मानले जाते. मात्र, त्यावर कंपनीचे प्रमुख के. व्ही. बलराम आणि त्यांच्या चमूने मात केली आहे. सीआयआयच्या प्रतिनिधींसमोर नुकतेच या प्रयोगाचे सादरीकरण झाले असून या प्रयोगामुळेही पाणीबचत साधणार आहे.

काटकसरीने पाण्याचा वापर, पुनर्वापर, जलपुनर्भरण यासह तोटी आणि हवेचा योग्य दाब या तंत्राने हे शक्य झाले. येत्या वर्षभरात २.५ लिटर पाण्यात एक लिटर बीअर उत्पादित करण्याचे उद्दिष्ट नव्याने ठरविण्यात आले आहे.
– के. व्ही. बलराम, प्रमुख, पाल्स ब्रेव्हरीज

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2014 at 05:34 IST

संबंधित बातम्या