बांधकाम ठेकेदाराचे बिल मंजूर करण्यासाठी लाच मागणार्‍या धुळे महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंत्याला २२ दिवसांनंतर अटक करण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता अनिल पगारवर ३० जानेवारीला लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला होता. यानंतर दुसर्‍याच दिवशी अनिल पगारने सेवानिवृत्त स्विकारली होती. यानंतर गुन्हा दाखल झाल्यापासून २२ दिवसांपासून अनिल पगार फरार होता.

धुळे महानगरपालिकेत अनिल यशवंत पगार कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होता. अनिल पगार ३१ जानेवारीला सेवानिवृत्त होणार होता. मात्र निवृत्तीच्या एक दिवस आधी ३० जानेवारी रोजी महानगरपालिकेतील एका बांधकाम कंत्राटदाराने अनिल पगार विरोधात लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. बांधकाम कंत्राटदाराने धुळे महापालिकेकडून मिळालेल्या कंत्राटानुसार प्रभाग क्रमांक १९ च्या वैभव नगर येथील खुल्या जागेवर भिंतीचे बांधकाम पूर्ण केले होते. त्या बांधकामाचे बिल मंजूर करुन देण्यासाठी कार्यकारी अभियंता अनिल पगार यांनी १२ हजार रुपयांची लाच मागितली होती. यासंदर्भात कंत्राटदार आणि अभियंता पगार यांच्यात १० जानेवारीला महापालिकेच्या आवारात लाच मागितल्यासंदर्भात झालेले संभाषण ध्वनीमुद्रीत करण्यात आले होते. त्यानुसार तक्रारदाराने सादर केलेल्या ध्वनीमुद्रणाची शहानिशा केल्यानंतर लाचलुचपत विभागाने ३० जानेवारीला धुळे शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांत तक्रार दाखल झाल्याची माहिती मिळताच अनिल पगार फरार झाला. विशेष म्हणजे ज्या दिवशी पगार विरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला, त्याच्या दुसर्‍याच दिवशी पगार सेवानिवृत्त झाले. धुळे आणि नाशिक जिल्ह्यात त्यांचा शोध सुरु होता. अखेर अग्रवाल नगरमधील राहत्या घरी आला असताना अनिल पगारला लाचलुचपत विभागाच्या पोलीस उपअधीक्षक सुनिल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील कर्मचा-यांनी सापळा रचून ताब्यात घेतले.