करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय! ४५ हजार विद्यार्थ्यांना होणार लाभ!

राज्यात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, त्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

college students
कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना होणार फायदा!

गेल्या दीड वर्षापासून राज्यात आणि देशभरात करोनाचं संकट ठाण मांडून बसलं आहे. या संकटकाळात इतर क्षेत्रांप्रमाणेच शिक्षण क्षेत्राचं देखील मोठं नुकसान झालं आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण, रद्द झालेल्या परीक्षा, परीक्षांशिवाय मूल्यांकनाच्या माध्यमातून लावण्यात येणारे निकाल अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या अकृषी विद्यापीठांसाठी शुल्क सवलत जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी शासकीय व खासगी कृषी महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुल्क सवलत देण्याचा निर्णय कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज जाहीर केला आहे. या निर्णयामुळे या ४ विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

१८९ महाविद्यालये, ४५ हजार विद्यार्थी!

कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील ३८ शासकीय आणि १५१ विनाअनुदानित अशा एकूण १८९ कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या ४५ हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आई-वडील, पालक यांचा करोनामुळे मृत्यू झाला असेल अशा विद्यार्थ्यांचे सुरू असलेले पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतच्या संपूर्ण शुल्कात सूट देण्याचा निर्णयही कृषीमंत्र्यांनी घेतला आहे.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय

> विद्यार्थ्यांकडे शुल्क थकीत असेल तर सत्र नोंदणी आणि परिक्षेचा अर्ज करण्यास अडवू नये. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी.

> राज्यातील कृषी विद्यापीठांच्या अधिनस्थ शासकीय व अशासकीय सर्व महाविद्यालयांचे सर्व पदवी, पदव्युत्तर व आचार्य या अभ्यासक्रमाच्या विविध शुल्कांमध्ये सवलत द्यावी.

> अनुदानित महाविद्यालये व कृषी विद्यापीठ विभागातील सर्व अभ्यासक्रमांसाठी आकारण्यात येणाऱ्या इतर शुल्कांमधील विद्यार्थी मदत निधी, विद्यार्थी सुरक्षा विमा शुल्क, वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शुल्क, महाविद्यालय नियतकालिक, अश्वमेध/क्रीडा महोत्सव शुल्क, विद्यार्थी वैद्यकीय तपासणी शुल्क, ओळखपत्र, विद्यार्थी सहायता / मदत / कल्याण निधी, स्नेहसंमेलन, गुण पत्रिका शुल्क, नोंदणी शुल्क, अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारचे खर्च करण्यात आलेला नाही, त्या बाबींसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात १०० टक्के सूट.

केंद्राची ५५८ कोटींची शिष्यवृत्ती राज्य सरकारकडे पडून

> जिमखाना, खेळ व इतर उपक्रम आणि ग्रंथालय यांची देखभाल व ग्रंथालयामध्ये ई-कन्टेंट विकत घेण्यासाठी खर्च करण्यात आला असल्याने याबाबतच्या शुल्कामध्ये ५० टक्के सूट देण्यात यावी. विद्यार्थ्यांकडून वसतिगृहचा उपयोग करण्यात येत नसल्याने वसतिगृह शुल्कापोटी आकरण्यात येणाऱ्या शुल्कात पूर्णपणे सूट देण्यात यावी.

> कायम विनाअनुदानित महाविद्यालयांकडून आकारण्यात येणारे विकास शुल्क (डेव्हलपमेंट फी) यामध्ये ५० टक्के सूट देण्यात यावी. विद्यार्थ्यांकडे मागील सत्रामध्ये प्रलंबित असलेले शुल्क ३ ते ४ हप्त्यात भरण्याची सवलत देण्यात यावी.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Exemption for students from various fees in agriculture collages in maharashtra amid covid pandemic pmw

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या