केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू गुरुवारी संसदेत रेल्वे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. प्रभू हे कोकणातील असल्याने कोकणवासीयांना त्यांच्याकडून यंदाच्या अर्थसंकल्पात मोठय़ा अपेक्षा असणार आहेत. कोकणवासीयांच्या या अपेक्षा पूर्ण करण्यात ते यशस्वी ठरतील का? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
प्रा. मधु दंडवते रेल्वेमंत्री झाले आणि कोकणात रेल्वे आली. आता सुरेश प्रभू रेल्वेमंत्री झाले. त्यामुळे कोकणवासीयांना काय मिळणार? हा खरा प्रश्न आहे. रेल्वे मंत्रालयावर गेल्या काही वर्षांपासून उत्तर भारतीय मंत्र्यांचा प्रभाव राहिला आहे. त्यामुळे राज्याला रेल्वे अर्थसंकल्पात फारसे काही आले नाही. अशी ओरड नेहमीच केली गेली. आता मात्र कोकणातील सुरेश प्रभू यांच्याकडेच रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आल्याने राज्यातील जनतेच्या अपेक्षांचे ओझे त्यांच्या पाठीवर असणार आहे.
 कोकण रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचे संकेत कोकण रेल्वेचे महाव्यवस्थापक भानुशाली यांनी नुकतेच दिले होते. या दुपदरीकरणाची अधिकृत घोषणा गुरुवारी होण्याची शक्यता आहे. तसे झाले तर रोहा ते सावंतवाडी दरम्यान कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण सुरू होऊ शकणार आहे. सुरेश प्रभू यांची घोषणा करणार काय? याकडे कोकणवासीयांचे लक्ष असणार आहे.
याशिवाय कोकणातील बंदरांना रेल्वेमार्गाने जोडण्याचे धोरण रेल्वे मंत्रालयाने अवलंबिले आहे. याअंतर्गत जयगड आणि दिघी बंदरांना रेल्वेमार्गाने जोडले जाणार आहे. जयगड बंदरातील प्रस्तावित रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र दिघी बंदर ते माणगाव दरम्यानच्या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण अद्याप झालेले नाही. त्यामुळे या रेल्वे अर्थसंकल्पात या दोन्ही बंदरांबाबत रेल्वेमंत्री कोणती काही घोषणा करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
अलिबागला रेल्वेमार्गाने जोडण्याची मागणी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी केली आहे. यासाठी पेण ते अलिबाग दरम्यान २८ किलोमीटर लांबीची रेल्वेलाइन टाकली जाणार आहे. या २८ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून यासाठी जवळपास ३४० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. एमएमआरडीए आणि रेल्वे बोर्डाचा संयुक्त प्रकल्प म्हणून या प्रकल्पाची उभारणी करण्याचा प्रस्ताव आहे. एमएमआरडीएने देखील या रेल्वेमार्गासाठी निधी देण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे. त्यामुळे गेल्या तीन दशकांपासून अलिबागकरांची मागणी या रेल्वे अर्थसंकल्पात मार्गी लागण्याची शक्यता आहे.
मुंबई ते सावंतवाडी दरम्यान विशेष जलद गाडय़ा असाव्यात आणि या जलद गाडय़ांना कोकणात जादा थांबे असावेत अशीही मागणी वेळोवेळी केली जात आहे. त्यावर रेल्वेमंत्री सकारात्मक असल्याचे त्यांनी नेहमीच स्पष्ट केले आहे. आता यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात प्रभू त्याबाबत काही तरतूद करणार का? हे पाहणेही औत्सुक्याचे आहे.
मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे यांच्यातील समन्वयाचा अभाव हा नेहमीच वादातीत मुद्दा राहिला आहे. पनवेल ते रोहा दरम्यान मध्य रेल्वे आणि त्यानंतर कोकण रेल्वे कार्यरत आहे. मात्र दोन्ही रेल्वे विभागात समन्वय आणि ताळमेळ नसल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. नागोठणे येथील रेल्वे अपघात असो अथवा रोहा येथील मोटरमनने गाडी पुढे नेण्यास दिलेला नकार असो यावरून दोघांमधील वाद नेहमीच चव्हाटय़ावर आले आहेत. याता हे वाद मिटवण्यासाठी रेल्वेमंत्री काही पावले उचलणार का? आणि कोकण रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण करण्याचादेखील प्रस्ताव आहे. याबाबतही काही निर्णय होणार का? याकडेही कोकणवासीयांचे लक्ष असणार आहे.
हर्षद कशाळकर, अलिबाग