महाराष्ट्रामध्ये सुरु असलेला प्रयोग मिनी यूपीएचाच- संजय राऊत

शिवसेना यूपीएमध्ये आली तरच मजबूत होईल असे कोणी सांगितले? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे

experiment that is going on in Maharashtra is Mini UPA Sanjay Raut

आता यूपीए नाही या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेससह अन्य पक्षांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. बॅनर्जी यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती आणि काँग्रेस नेतृत्वावर टीका करत आता यूपीए नाही असे म्हटले होते. त्यावर नवा वाद सुरु झाला आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

“राहुल गांधी यांना भेटणार आहे, यांना तुम्ही सौजन्य भेट का म्हणत नाही? महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत सहभागी झालेला पक्ष आहे. समान मुद्द्यावर आम्ही सरकार चालवत आहोत. सरकार उत्तम चाललेले आहे.  तिन्ही पक्षामध्ये संवाद असावा आम्हाला वाटते म्हणून दिल्लीत असताना चर्चा करतो. त्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर, देशातील घडामोडींवर चर्चा करतो. पाच राज्यांमध्ये निवडणुका आहेत. आम्ही गोव्यात निवडणूक लढवत आहोत. उत्तर प्रदेश निवडणूक लढवण्यासाठी आम्ही चाचपणी करत आहोत. अशावेळी काँग्रेस गोवा आणि उत्तर प्रदेशात निवडणुका लढवत आहेत,” असे संजय राऊत म्हणाले.

“आम्ही कोणाचाही भाग झाल्याशिवाय तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून राज्याच्या सत्तेमध्ये आहोत. यूपीएमध्ये भिन्न विचारांचे पक्ष एकत्र येतात आणि सत्ता स्थापन करतात. वाजपेयींच्या एनडीएमध्ये राम मंदिराला विरोध करणारे देखील पक्ष होते. यूपीएमध्ये सुद्धा अशा प्रकारचे पक्ष होते. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये सुद्धा भिन्न विचारांचे पक्ष आहेत. महाराष्ट्रामध्ये जो प्रयोग सुरु आहे तो मिनी यूपीएचाच प्रयोग आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

“यूपीएमध्ये नाही आहोत यावर आम्ही बघू. त्याबाबत कोणालाही चिंता करण्याची गरज नाही. हा शिवसेनेचा प्रश्न आहे. त्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील आणि आम्ही सक्षम आहोत निर्णय घेण्यासाठी. पण उद्धव ठाकरे यांची कायम भूमिका आहे की, यूपीए किंवा विरोधी पक्षांची आघाडी अधिक मजबूतीने पुढे यायला हवी. हे जसे शरद पवार यांचे म्हणणे आहे तशीच उद्धव ठाकरे यांचेही आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

“शिवसेना यूपीएमध्ये आली तरच मजबूत होईल असे कोणी सांगितले? आम्ही महाराष्ट्रात काँग्रेससोबतच आहोत. आम्ही संसदेतही एकत्र आहोत. लोकसभा आणि राज्यसभेतील निर्णय घेतानाही आम्ही एकत्र आहोत,” असेही राऊत यांनी म्हटले आहे.

“शिवसेना गोव्यात स्वतंत्र्य जागा लढण्यास चाचपणी करत आहे. गोव्यामध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि तृणमूलने आघाडी स्थापन केली आहे. शिवसेनेला त्या आघाडीत जायचे नाही. गोव्याच्या जनतेची मानसिकता आम्हाला माहिती आहे. गोव्यात काय होईल हे तृणमूलपेक्षा शिवसेनेला जास्त माहिती आहे. महाराष्ट्र आणि गोव्याचे नाते आहे. आदित्य ठाकरे गोव्यावर लक्ष ठेवून आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Experiment that is going on in maharashtra is mini upa sanjay raut abn