रविवारी अपहरण करण्यात आलेले गुहाचे सरपंच अब्बास शेख यांची पोलिसांनी सुटका केली. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून अद्याप तिघे जण फरार आहेत. पोलिसांनी पकडलेल्या आरोपींकडून एक गावठी कट्टा, चार भ्रमणध्वनी जप्त केले आहेत.
शेख हे आपल्या तांभेरे (ता. राहुरी) येथील शेतावर गेले असता स्कॉर्पिओमधून आलेल्या दोन तीन जणांनी त्यांना बळजबरीने गाडीत बसवून घेऊन गेले. त्यानंतर शेख यांचा मुलगा जाकीर याने राहुरी पोलिसात फिर्याद देऊन त्या गाडीचा क्रमांक सांगितला. राहुरी पोलिसांचे पथक गेवराई, बीड जिल्ह्यात गेले. गेवराईजवळील टाकळीमानूर येथे अपहरणकर्त्यांना पोलीस आल्याचा सुगावा लागला. या वेळी १० किलोमीटर अंतरापर्यंत थरारक पाठलाग करत आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.
विशेष म्हणजे अपहृत सरपंच शेख पोलिसांना सुखरूप मिळाले. वैभव चंद्रकांत काकडे (वय ३८, अंकुशनगर, बालेदीर, जि. बीड), अविनाश बबन सुतार (वय ३०, रा. सरस्वती कॉलनी, गेवराई) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा आणि चार भ्रमणध्वनी हस्तगत करण्यात आले. पकडलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सतीश जानवडे (रा. मातुरी, ता. शिरूर, जि. बीड), आदिनाथ खेडकर (चराटा, ता. आष्टी, जि. बीड) आणि प्रमोद सखाराम मोरे (रा. मोरे गल्ली, गेवराई, बीड) या तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते अद्याप फरार आहेत.