तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे सोमवारी सायंकाळी फटाके कारखान्यात शोभेच्या दारूचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला. या स्फोटात ५ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तासगाव-सांगली मार्गावर ईगल फायर वर्क्‍स या फटाक्याच्या कारखान्यात सोमवारी सहा वाजण्याच्या सुमारास दोन स्फोट झाले. यामध्ये कारखान्यात काम करीत असलेले ६ जण जागीच ठार झाले. मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याने त्यांची ओळख पटविण्यात अडथळे येत असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. अन्य ५ जणांना गंभीर जखमी अवस्थेत सांगलीच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
आग विझविण्यासाठी सांगली महापालिका व तासगाव नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाडय़ा प्रयत्नशील होत्या. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते.
फटाके कारखान्यात लग्न सराईसाठी औट, भुसनळे आणि अन्य फटाके तयार करण्यात येतात. ४ एकर परिसरातील या कारखान्यात यंत्रामार्फत फटाके तयार करण्यात येतात. वेगवेगळ्या फटाक्यांसाठी वेगवेगळ्या इमारती असून यापकी एका निर्मितीस्थळावर प्रथम स्फोट झाला. त्यानंतर गोदामात फटाके पँकिंगचे काम सुरू असताना त्या ठिकाणीही स्फोट झाला. या वेळी कारखान्यात ११ जण होते. यापकी ६ जणांचा जागीच मृत्यू झाला.
कवठे एकंद येथील ग्रामदैवत बिराडसिद्ध देवाच्या पालखीसमोर विजयादशमी दिवशी शोभेच्या दारूची रात्रभर आतषबाजी करण्यात येते. त्यामुळे घरटी दारू तयार करण्यात येते. ऑक्टोबर २०१३ मध्ये दसऱ्याच्या दिवशीच शोभेच्या दारूचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा बळी गेला होता. तत्पूर्वी अशा ६ दुर्दैवी घटना घडल्या असून त्यामध्ये १४ जणांचा बळी गेला आहे.