सांगली : सांगलीसह  सात बाजार समितींना देण्यात आलेली मुदतवाढ शुक्रवारी समाप्त होत असून त्यानंतर प्रशासक नियुक्त केली जाण्याची शक्यता आहे. प्रशासक म्हणून उपनिबंधकांच्या हाती बाजार समितीचा कारभार जाणार आहे. करोना संसर्गामुळे सांगलीसह पलूस, आटपाडी, तासगाव, विटा, इस्लामपूर, शिराळा या कृषी उत्पन्न  बाजार समितीच्या निवडणुका गेली दीड वर्षे लांबणीवर पडल्या आहेत. शासनाने विद्यमान संचालक मंडळाला वेळोवळी मुदतवाढ दिली असून ही मुदतवाढसुध्दा शुक्रवार दि.  २३ एप्रिल रोजी समाप्त होत आहे.

राज्य शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी हिरवा कंदील दर्शवल्यानंतर पहिल्या टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेसह गावपातळीवरील विकास सोसायटीच्या निवडणुकीचा कार्यक्रम  हाती घेण्यात आला. सोसायटी निवडणुका झाल्यानंतर मतदार यादी निश्चित करून निवडणुका घेण्याचे आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले असल्याने बाजार समितीच्या निवडणुका लांबणीवर पडल्या.

या सर्व कारणांमुळे गेल्या दीड वर्षांपासून बाजार समितीच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. विद्यमान संचालक मंडळाला देण्यात आलेली मुदतवाढ शुक्रवार २३ एप्रिलपर्यंत असल्याने त्यानंतर बाजार समितीचा कार्यभार उपनिबंधकांच्याकडे सोपविला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत  आहे. तथापि, मंत्रिमंडळामध्ये पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला तर पुन्हा विद्यमान संचालक मंडळास मुदतवाढ मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.