राज्यात आजही अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा * मराठवाडय़ात पिकांचे नुकसान

पुणे : किनारपट्टीवरील कमी दाबाच्या पट्टय़ामुळे मुंबई, ठाण्यासह कोकणात सर्वच ठिकाणी धुवाधार पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. गेल्या चोवीस तासांत रत्नागिरीत २६० मिलिमीटर पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही पाऊस झाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभागात आणि पश्चिम-मध्य महाराष्ट्रात सोमवारीही (१९ जुलै) जोरदार पावसाची शक्यता असून, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत आणि पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्य़ांच्या घाट विभागांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्र किनारपट्टी ते कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत सध्या कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. परिणामी किनारपट्टीवरून मोठय़ा प्रमाणावर बाष्प जमिनीकडे येत असल्याने कोकण विभागात सर्वत्र पाऊस होत आहे.  भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली.

कोकणपासून पश्चिम महाराष्ट्रातील लगतच्या भागातही पावसाने जोर धरला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबई परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. पश्चिम-मध्य महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर आणि पुणे जिल्ह्य़ांतील घाटविभागातही जोरदार पाऊस सुरू आहे. मराठवाडय़ात लातूर आणि नांदेड जिल्ह्य़ांत काही भागांत मुसळधार पाऊस झाला.

मराठवाडय़ात गेल्या आठवडय़ातही जोरदार पाऊस झाला. या आठवडय़ातही काही भागांत पावसाची हजेरी आहे. गेल्या चोवीस तासांत प्रामुख्याने लातूर आणि नांदेड जिल्ह्य़ांत जोरदार पाऊस झाला. लातूर जिल्ह्य़ात सततच्या पावसाने खरीप हंगामाची पिके धोक्यात येत असून, सोयाबीनसह इतर पिकांची वाढ खुंटत चालली आहे. पावसामुळे हंगाम धोक्यात येण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.

पाऊसभान..

’कोकण विभागातील मुंबई, ठाण्यासह सर्वच जिल्ह्य़ांमध्ये २२ जुलैपर्यंत जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

’रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांतील काही भागांमध्ये १९ जुलैला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

’पश्चिम-मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्य़ांतील घाटविभागामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस ते अतिवृष्टी होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.