उत्तर महाराष्ट्रातील सहाही जागांवर वर्चस्व राखत महायुतीने आघाडीचा अक्षरश: धुव्वा उडविला. त्यातही नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी राष्ट्रवादीचे ‘विकास पुरूष’ छगन भुजबळ यांचा आणि नंदुरबारमध्ये विश्वविक्रमाच्या दिशेने निघालेले व दहाव्यांदा विजयाची स्वप्ने पाहणारे काँग्रेसचे केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचा भाजपच्या हीना गावित यांनी केलेला पराभव देशभर चर्चिला गेला. जळगाव व रावेर हे दोन्ही मतदारसंघ कायम ठेवत भाजपने प्रतिष्ठा राखली. तर, धुळ्यात डॉ. सतीश भामरे यांनी बलाढय़ काँग्रेस उमेदवार आ. अमरीश पटेल यांना पराभूत करून मतदारसंघ सलग दुसऱ्यांदा भाजपकडे राखला. या सर्व उमेदवारांच्या विजयात मोदी लाटेचा वाटा सर्वाधिक.
नाशिकमध्ये हेमंत गोडसे ‘जायंट किलर’ 
नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे (शिवसेना) उमेदवार हेमंत गोडसे यांना ४९४७३५ मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी आघाडीचे (राष्ट्रवादी)उमेदवार छगन भुजबळ यांना ३०७३९९ मते मिळाली. गोडसे यांनी मिळविलेला विजय नाशिककरांसाठी बिल्कूल अनपेक्षित नव्हता. केवळ त्यांना मिळालेले एक लाख ८७ हजार ३३६ मताधिक्य सर्वासाठीच अनपेक्षित ठरले.
नाशिकमधून राष्ट्रवादीकडून सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांचा सहज विजय गृहीत धरण्यात येत होता. परंतु प्रचाराचा एकेक दिवस पुढे सरकत गेला. आणि परिस्थिती बदलत गेली. भुजबळांना त्याची जाणीव झाल्यावर त्यांनी काँग्रेसला चुचकारण्यासह समाजातील विविध घटकांच्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यास सुरूवात केली. मनसे आणि महायुतीच्या उमेदवारात मतविभागणी होऊन भुजबळांचा विजय सुकर होईल, असा राष्ट्रवादीचा अंदाज होता. परंतु मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांचा कोणताही प्रभाव पडेनासा झाल्याने भुजबळ विरोधातील मते गोडसे यांच्यामागे एकवटू लागली. गोडसे यांनी ग्रामीण भागासह शहरी भागात प्रचाराचे सूक्ष्म नियोजन केले. वासुदेवचा वापर, पथनाटय़े अशा प्रकारे त्यांनी प्रचार केला. पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांचे केलेले सांत्वन, आघाडी सरकारच्या नाकर्तेपणाबद्दल गावागावातून केलेला प्रचार, मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले नातलगांचे जाळे, काँग्रेससह राष्ट्रवादी व मनसेतही असलेले संबंध, हे सर्व गोडसे यांना ग्रामीण भागात कामास आले. तर, शहरी भागात मोदी लाट त्यांच्या कामास आली. भुजबळ यांच्यासाठी शरद पवारांपासून नबाब मलिकांपर्यंत सर्वाच्या सभा झाल्या. भ्रष्टाचाराचे आरोप, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना मिळणारे अभय या कारणांमुळे त्यांची प्रतिमा मलिन झाली होती. विकास कामांची जंत्रीही त्यापुढे फिकी पडली. त्यातच मित्रपक्ष काँग्रेसकडून फारशी साथ त्यांना मिळाली नाही. पोलिसांच्या लेखी गुन्हेगार असलेल्या अनेक कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा फलकांवर भुजबळांना मिळणारे स्थानही नाशिककरांना खूपणारे ठरले.
भुजबळ यांनी कोणत्याही कामात काँग्रेसला विश्वासात घेतले नसल्याचे उट्टे काँग्रेसी मंडळींनी काढले. तीन आमदार आणि महापालिका ताब्यात असतानाही मनसेने कोणतेच काम न केल्याचा फटका मनसे उमेदवाराला बसला. डॉ. पवार यांना केवळ ६० हजार ३५० मते मिळाल्याने त्यांची अनामत जप्त झाली. त्याचा फटका भुजबळांनाही बसला. कारण पवार जास्त मते मिळवू न शकल्याने ती मते गोडसेंना जाऊन मिळाली. आणि त्यांचा विजय सुकर झाला. त्यातच मागील निवडणुकीपेक्षा सुमारे १४ टक्के अधिक झालेले मतदान गोडसे यांच्या विजयास कारणीभूत ठरले. विजयाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना गोडसे यांनी नाशिकच्या मतदारांनी अपेक्षेहून अधिक मताधिक्य देत पदरात टाकलेल्या विजयामुळे जबाबदारी वाढल्याचे सांगितले. तर, छगन भुजबळ यांनी अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
दिंडोरीत चव्हाणांची ‘हॅटट्रीक’
शरद पवार यांच्या मते राष्ट्रवादीसाठी सर्वाधिक सुरक्षित असणाऱ्या दिंडोरी या मतदारसंघात महायुतीच्या हरिश्चंद्र चव्हाण यांनी काँग्रेस आघाडीच्या डॉ. भारती पवार यांचा तब्बल दोन ४७ हजार ६१९ मतांनी दणदणीत पराभव करत हॅटट्रीक साधली. चव्हाण यांना ५ लाख ४२ हजार ७८४ तर डॉ. पवार दोन लाख ९५ हजार १६५ मते मिळाली.
चव्हाणांचा विजय अपेक्षित असला तरी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला या मतदारसंघाचा अंदाज आला नाही आणि मतमोजणीत आघाडीचा उमेदवार लढत देण्याच्या स्थितीतही येऊ शकला नाही. माजी आदिवासी विकासमंत्री ए. टी. पवार यांच्या कामांचा करिष्माही सुनबाईंच्या उपयोगी ठरू शकला नाही. सलग दोन वेळा चव्हाणांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. या काळात भरीव नसली तरी केलेली कामे आणि सर्वसामान्यांमध्ये मिसळणारी व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले. त्यात निवडणुकीच्या काही दिवस अगोदर बेमोसमी पावसाने शेती उध्वस्त केली होती. त्याची नुकसान भरपाई जाहीर होण्यास आणि प्रत्यक्ष मदत मिळण्यात कालापव्यय झाला. त्याचा रोष मतपेटीद्वारे ग्रामीण भागातून व्यक्त झाला. नरेंद्र मोदींविषयी प्रचंड उत्सुकता होती. त्याचाही लाभ जाहीर सभा न होता देखील चव्हाणांना मिळाला. पावसाचे अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी गुजरातने पळवून नेल्याची ओरड काँग्रेस आघाडीकडून करण्यात आली. प्रत्यक्षात महाराष्ट्र-गुजरातमधील पाणी वाटपाचा करार काँग्रेस आघाडीने केल्याची बाब चव्हाणांनी मतदारांना पटवून दिली. काँग्रेस आघाडीने प्रचारात मांडलेले मुद्दे प्रभावीहिन ठरले. शरद पवार, अजित पवार, आर. आर. पाटील आदींनी सभा घेऊनही सुरक्षित वाटणाऱ्या मतदारसंघात आघाडीला दारुण पराभवास सामोरे जावे लागले. विजयाबद्दल चव्हाण यांनी ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होती असे सांगत भ्रष्टाचार व झुंडशाही विरोधात मतदारांनी मतदान करून काँग्रेस आघाडीला त्यांची जागा दाखवून दिली, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रचारात काँग्रेस आघाडीने विकासाचा कार्यक्रम मांडूनही मतदारांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून मतदान केल्याचे डॉ. भारती पवार यांनी सांगितले.
हिना गावित देशातील सर्वात युवा खासदार
नंदुरबार मतदारसंघात अतिशय चुरशीच्या लढतीत भाजपच्या हिना गावितांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माणिकराव गावितांचा एक लाखाहून अधिक मतांनी पराभव करून काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावला. स्वातंत्र्यानंतर प्रथमच या मतदारसंघात काँग्रेसेतर पक्षाला संधी मिळाली. सलग नऊ वेळा काँग्रेसच्या पदरात भरभरून मतांचे दान टाकणाऱ्या नंदुरबारमध्ये भाजपचा विजय अनपेक्षित म्हणावा लागेल.
डॉ. हिना यांना पाच लाख ७९ हजार ४८६ तर माणिकराव गावितांना चार लाख ७२ हजार ५८१ मते मिळाली. गुजरातला लागून असणाऱ्या या मतदारसंघात नरेंद्र मोदींची लाट प्रभावी ठरली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डॉ. विजयकुमार गावितांची मुलगी हिनाने भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळविली. त्यामुळे राष्ट्रवादीने विजयकुमारांना बाहेरचा रस्ता दाखविला. या घडामोडींमुळे एका दिवसात या मतदारसंघात राष्ट्रवादी होत्याचे नव्हते झाली.
राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उघडपणे माणिकरावांच्या विरोधात काम केले. प्रदीर्घ काळ प्रतिनिधीत्व करूनही आणि दोन वेळा केंद्रात मंत्रीपद मिळवूनही माणिकरावांनी नंदुरबारच्या विकासात कोणतेही योगदान दिले नसल्याचा मुद्दा मांडण्यात महायुती यशस्वी झाली. त्यात या ठिकाणी मोदींची झालेली सभा महायुतीच्या पथ्यावर पडली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची रद्द झालेली सभा माणिकरावांना महागात पडली. हिना गावित यांचे वडील डॉ. विजयकुमार गावित यांनी मोदी लाट आणि नऊ वेळा निवडून येऊनही स्थानिक खासदारांनी कोणतेही काम केले नसल्याने हा विजय मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. माणिकराव गावित यांनी देशातील मोदींच्या सुनामीचा फटका बसल्याचे मान्य केले.
धुळ्यात मोदी लाटेवर  महायुती स्वार
धुळे लोकसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत महायुतीचे डॉ. सतीश भामरे यांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार अमरिश पटेलांचा एक लाख ३० हजारहून अधिकच्या मताधिक्याने पराभूत केले. या मतदारसंघातील निकाल अपेक्षित असला तरी डॉ. भामरेंचे मताधिक्य मात्र अपेक्षित नव्हते. डॉ. भामरेंना पाच लाख ५९ हजार ४५० तर पटेलांना तीन लाख ९८ हजार ७२७ मते मिळाली.
 मागील निवडणुकीत या मतदारसंघात ४२ टक्के मतदान झाले होते. तर यावेळी त्यात तब्बल १६ टक्के वाढ झाली. मागील निवडणुकीत पराभूत होवूनही काँग्रेस आघाडीने पटेल यांना संधी दिली होती. यंदा जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) निहालभाई अहमद रिंगणात नसल्याने काँग्रेस आघाडीची आशा पल्लवीत झाली होती. मोदींच्या लाटेमुळे अल्पसंख्यांकांची मते एकगठ्ठा आपल्याला मिळतील या भ्रमात काँग्रेसजन राहिले. रिंगणात उतरलेल्या अल्पसंख्यांक उमेदवारांची संख्या मोठी होती. त्यांनी एकत्रित बरीच मते हिरावून घेतली. त्यात पटेल यांनी राज्यभर गवगवा झालेल्या शिरपूर पॅटर्नचा प्रचारात प्रभावीपणे वापर केला. निवडून आल्यास ही पध्दती संपूर्ण मतदारसंघात अंमलात आणण्याचे आश्वासन दिले. त्यांच्याकडून करण्यात आलेले अर्थकारणही प्रचारादरम्यान चर्चेचा विषय ठरले. तथापि, मोदींच्या लाटेपुढे काँग्रेस आघाडीच्या एकाही मुद्दय़ाचा निभाव लागला नाही.
 सत्यजितराजे गायकवाड यांनी काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरीची घोषणा केली होती. त्यांची बंडखोरी खरे तर पटेल यांच्या पथ्थ्यावर पडणारी होती. कारण त्यामुळे मालेगाव व बागलाण तालुक्यातील मतांची विभागणी झाली असती. महायुतीकडे जाणारी मते काही प्रमाणात गायकवाड यांच्याकडे गेली असती. परंतु काँग्रेसने गायकवाड यांचे बंड शमविले. आणि तेच त्यांना महागात पडले. भाजपला या ठिकाणी योग्य उमेदवार मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या डॉ. भामरे यांना आयात करून उमेदवारी दिली. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या डॉ. भामरेंना मोदी लाटेने थेट लोकसभेत पोहोचले.
रावेरमध्ये भाजपची ‘रक्षा’
रावेर मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांना सहा लाख ५४ हजार ५२ मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी आघाडीचे मनीष जैन यांना दोन लाख ८७ हजार ३८४ मते मिळाली. रक्षा खडसे या तीन लाख १८ हजार ६८ मताधिक्याने विजयी झाल्या. या मतदारसंघात निवडणुकीच्या तोंडावर नाटय़मय घडामोडी घडल्या होत्या. हरिभाऊ जावळे यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली होती. ऐनवेळी त्यांचे तिकीट कापून खडसेंनी रक्षा यांना रिंगणात उतरविले. या मतदारसंघात केवळ दोन विधानसभा मतदारसंघ भाजपकडे असूनही खडसेंनी नियोजनबध्द प्रचार यंत्रणा राबविली. राष्ट्रवादीचे उमेदवार मनीष जैन यांच्यासाठी शरद पवार, आर. आर. पाटील, मनीष यांचे वडील ईश्वरलाल जैन आदींनी प्रचारसभा घेतल्या. परंतु जैन यांची उमेदवारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाच रूचली नव्हती. त्यातच काँग्रेसने या जागेवर हक्क सांगूनही त्यांना ती सोडण्यात न आल्याने काँग्रेसही जैन यांच्या प्रचारापासून दूरच राहिली. काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी बंडखोरी केली. विधान परिषद निवडणुकीत मनीष जैन यांच्याकडूनच रक्षा खडसे यांचे दिवंगत पती निखिल यांचा पराभव झाला होता. त्यामुळे रक्षा खडसे यांना सहानुभूतीही मिळाली. त्यातच एकनाथ खडसे यांनी पक्षांतंर्गत गिरीश महाजन यांच्याशी तसेच शिवसेनेच्या नेत्यांशी नमते घेत जुळवून घेतले. त्यातच मोदींची प्रचंड सभा घेऊन त्यांनी विरोधकांना हालचाल करण्यास जागाच ठेवली नाही. या विजयाचा उपयोग अधिकाधिक प्रमाणात जनकल्याणासाठी करण्याचा निर्धार रक्षा खडसे यांनी व्यक्त केला आहे.
जळगावमध्ये मोदी लाटेचा चमत्कार
मतदारसंघात भाजपचा उमेदवार नाही..शिवसेना आणि भाजपचे फारसे सख्य नाही..विशेष काम नसल्याने लोकांमध्ये नाराजी..असा सर्व नकारात्मक सूर असतानाही जळगाव मतदारसंघात महायुतीचे ए. टी. पाटील यांना सहा लाख ४७ हजार ७७३ मते मिळाली. तर, त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी आघाडीचे डॉ. सतीश पाटील यांना दोन लाख ६४ हजार २४८ मते मिळाली. ए. टी. पाटील हे तब्बल तीन लाख ८३ हजार ५३५ मताधिक्याने विजयी झाले. हा विजय सर्वासाठीच अनपेक्षित ठरला. या मतदारसंघात मागील निवडणुकीत ४२.४३ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत सुमारे १६ टक्क्यांनी त्यात वाढ झाली. या मतदारसंघात भाजपचा एकही आमदार नसताना त्यांनी हे मताधिक्य मिळविले. शिवसेनेचे दोन आमदार असून त्यातही आ. सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीने प्रतिस्पर्धी डॉ. पाटील यांना पाठिंबा दिलेला होता. एकटे एरंडोलचे शिवसेना आमदार चिमणराव पाटील ए. टी. पाटील यांच्यासोबत होते. अशी परिस्थिती असतानाही ए. टी. पाटील यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आपलेसे करण्यात यश मिळविले. त्याचा त्यांना काही प्रमाणात लाभ झाला. उलट मतदारसंघात राष्ट्रवादीचे चार आमदार असूनही आणि खान्देश विकास आघाडीने पाठिंबा देऊनही डॉ. पाटील यांना त्याचा कोणताच लाभ झाला नाही. मोदी लाटेच्या प्रभावासमोर विरोधी उमेदवारांचा अक्षरश: पालापाचोळा झाला. मोदी लाटेमुळे विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांचे कोणतेही काम नसताना झालेला विजय हा एक चमत्कार मानला जात आहे. खुद्द पाटील यांनीही या विजयाचे श्रेय मोदी यांनाच दिले आहे.