कोकणच्या सांस्कृतिक जीवनाचे अविभाज्य अंग बनलेला ‘पुलोत्सव’ हा अनोखा कार्यक्रम यंदा गुणी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, तरुण गायक आनंद भाटे आणि कविश्रेष्ठ मंगेश पाडगावकर यांच्या सहभागाने रंगणार आहे. नवनिर्वाचित साहित्य संमेलनाध्यक्ष फ. मुं. शिंदे यांची उपस्थिती हे या महोत्सवाचे खास आकर्षण ठरणार आहे.
  विविध कल्पक उपक्रम राबवणारी आर्ट सर्कल, रत्नागिरी आणि पुण्याच्या आशय सांस्कृतिकतर्फे येथील स्वा. सावरकर नाटय़गृहात येत्या १८ ते २० ऑक्टोबर या काळात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे हे सहावे वर्ष आहे.
  साहित्य, संगीत आणि कलांचा संगम असलेल्या या महोत्सवाबद्दल आर्ट सर्कलचे अध्यक्ष जयंत प्रभुदेसाई व अन्य पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, नवनिर्वाचित साहित्य संमेलनाध्यक्ष शिंदे यांच्या हस्ते १८ ऑक्टोबरला संध्याकाळी सात वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. सुरेल गायनामुळे बालपणीच ‘आनंद गंधर्व’ पदवी मिळालेले किराणा घराण्याचे तरुण गायक आनंद भाटे यांना या कार्यक्रमामध्ये ‘तरुणाई पुरस्कार’ देण्यात येणार असून त्यानंतर त्यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी ते नाटय़गीत, ठुमरी, भजन इत्यादी गायन प्रकार सादर करणार आहेत.
  महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी १९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पुलोत्सव सामाजिक कृतज्ञता पुरस्काराचे वितरण प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. यंदा हा पुरस्कार लांज्याच्या महिलाश्रम संस्थेला जाहीर झाला आहे. विविध वयोगटांच्या गरजू मुली व महिलांना आश्रय देऊन जीवनात आपल्या पायांवर उभे करण्याचे काम ही संस्था गेली ५७ वष्रे करीत आहे. पुरस्कार वितरणानंतर सोनाली आणि लेखक-अभिनेता मिलिंद फाटक यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम असून कविश्रेष्ठ मंगेश पाडगावकर यांच्या गीतांवर आधारित ‘माझे जीवनगाणे’ या कार्यक्रमाने त्या सत्राचा समारोप होणार आहे.       महोत्सवातील प्रतिष्ठेचा ‘पुलोत्सव सन्मान’ पुरस्कार महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी, २० ऑक्टोबर रोजी पाडगावकर यांना पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. पद्मविभूषण पुरस्कारानंतर पाडगावकर प्रथमच रत्नागिरीत येत आहेत. या पुरस्कार वितरणानंतर सोनाली कुलकर्णी आणि मिलिंद फाटक यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘व्हाइट लिली नाइट रायडर’ या नाटकाने महोत्सवाची सांगता होणार आहे.