विधिमंडळाचे आजपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन शेतकरी, स्वातंत्र्यवीर सावरकर या मुद्दय़ांवरून तापण्याचे संकेत आहेत. अशातच काल विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सावरकर मुद्द्यावर घेतलेल्या भूमिकेवरुन शिवसेनेला सुनावले आहे. फडणवीस यांनी महापुरुषांचा आदर करण्यासंदर्भात सौदेबाजी सुरु आहे का असा सवाल शिवसेनेला केला आहे.

‘रेप इन इंडिया’ या आपल्या वादग्रस्त विधानावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी, या भाजपाच्या मागणीवर राहुल गांधी यांनी मंगळवारी भाष्य केलं. दिल्लीतील रामलीला मैदानावर झालेल्या देश बचाव रॅलीमध्ये “माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे. त्यामुळे मी कदापी माफी मागणार नाही,” अशा वादग्रस्त शब्दांत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर राहुल गांधी यांच्यावर चहुबाजूंनी टीका होत असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपाने तसेच सावरकरप्रेमींनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसबरोबर सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेही सावरकरांबद्दलच्या राहुल गांधींच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. शिवेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबद्दल बोलताना, “आम्हाला महात्मा गांधी आणि पंडित नेहरु यांच्याविषयी आदर आहे. मात्र कोणीही वीर सावरकरांचा अपमान करु नये. बुद्धीमान लोकांना याबाबत वेगळं काही सांगण्याची गरज नाही. वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नाहीत तर देशाचे दैवत आहेत. सावरकर या नावातच राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहेत. नेहरु-गांधी यांच्याप्रमाणेच वीर सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा इथे कोणतीही तडजोड नाही,” असं म्हटलं होतं.

यावरुन आता फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. “आम्ही गांधी आणि नेहरूंना मानतो, म्हणून तुम्ही सावरकरांना माना?‬
‪ही कुठली सौदेबाजी आहे?‬,” असा सवाल फडणवीस यांनी शिवसेनाला केला आहे. तसेच, “‪सावरकर देशभक्त होतेच, सावरकरांना मानावेच लागेल,” असंही फडणवीस यांनी शिवसेना आणि काँग्रेसला टोला लगावताना म्हटलं आहे.

फडणवीस यांनी या फेसबुकवर यासंदर्भात केलेल्या पोस्टमध्ये #WinterSession‬, #MaharashtraAssemblySession, #Nagpur असे तीन हॅशटॅग वापरले असल्याने भाजपा नागपूरमधील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सावकर मुद्द्यावरुन शिवसेना आणि महाविकास आघाडील घेरण्याच्या तयारीत असल्याचे उघड होत आहे.