Women’s Reservation Bill Rejection 2026 : नारी शक्ती वंदन विधेयक लोकसभेत नामंजूर करण्यात आलं. विरोधकांनी एकजुटीने या विधेयकाला विरोध दर्शवल्याने सरकारला दोन तृतियांश मते जमा करता आली नाहीत, परिणामी हे विधेयक संसदेत पराभूत झालं. यामुळे विधानसभा आणि लोकसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार नाही. यावरून सरकारने विरोधकांवर टीकास्र डागायला सुरुवात केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हे आरक्षण लागू करण्याकरता आता चंग बांधला असून विरोधकांना यावरून आव्हानच दिलं आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काँग्रेसचं वर्षानुवर्षे राज्य होतं, पण त्यांनी कधीही महिलेला मुख्यमंत्री बनू दिलं नाही. मी तर आज ओपन चॅलेंज देतो, माझ्या स्तरातील त्यांच्या कोणत्याही नेत्याने माझ्याबरोबर महिला विधेयकावर ओपन डिबेट करावं, त्या पद्धतीत काय चूक आहे यावर चर्चा करावी. पण ते करणार नाही.”

असं असेल नियोजन

ते पुढे म्हणाले, “देशभरात आणि महाराष्ट्रात आता महिलांचं एकत्रीकरण करणार आहे. अशाप्रकारेच महिलांच्या अधिकाऱ्यांची भ्रूणहत्या होत आहे. लोकशाहीत महिलांचा रेटा, ज्यादिवशी महिलांना उत्तर देऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण होईल तेव्हा ते महिला आरक्षण विधेयकाला मान्यता देतील. महायुतीतील सर्व पक्ष यासंदर्भात जनमत एकत्रित करण्याचं काम करणार आहोत. या बिलाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील १ कोटी महिलांच्या सह्या गोळा करणार आहोत. त्यासोबत तालुका स्तरावर जनजागृती करणार आहोत. भारतीय जनता पक्षाने यासंदर्भातील मेळावा बोलावला आहे. तिथे मित्रांना निमंत्रित करू. “

आता आम्ही स्वस्थ बसणार नाही

“सर्व पक्ष महिलांमध्ये जनजागृती करून, महाराष्ट्रात काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आणि उबाठाचा चेहरा उघडा करू. निश्चितपणे असा जनमताचा रेटा तयार होईल, की त्यांना निश्चितपणे महिला आरक्षण विधेयकाला मंजूर करून द्यावा लागेल. जोपर्यंत महिलांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आता आम्ही स्वस्थ बसणार नाही”, अशी ठाम भूमिकाही त्यांनी मांडली.