महापालिकेतील पाकीट व टक्केवारीची संस्कृती बंद करण्यात अपयश आल्याची कबुली कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. नगरसेवकांकडून अधिका-यांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याबद्दल खंत व्यक्त करून त्यांनी या विषयाबाबत लोकसभा निवडणूक निकालानंतर बैठक घेवून तोडगा काढणार असल्याचेही या वेळी स्पष्ट केले.     
महापालिकेतील काही नगरसेवकांच्या त्रासाला कंटाळून दोन दिवसांपूर्वी जलअभियंता मनीष पवार दीर्घ रजेवर गेले आहेत. लगोलग शनिवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातून महापालिकेत आलेल्या सर्वच अधिका-यांनी परत प्राधिकरणाकडे जाण्यासाठी अर्ज सादर केले. तसेच सात अधिका-यांनी आपल्याला कार्यमुक्त करावे, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे महापालिका वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. तसेच हे अधिकारी परत गेले तर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेचा बोजवारा उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पाश्र्वभूमीवर सर्किट हाउस येथे कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिकारी, पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक घेऊन चर्चा केली. या वेळी महापौर सुनीता राऊत, उपमहापौर मोहन गोंजारी आदी प्रमुख उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले, महापालिकेत मोठय़ा प्रमाणात विकास निधी आणला. यातून शहराचा विकास व्हावा अशी अपेक्षा होती. मात्र महापालिकेत सुरू असलेल्या पाकीट व टक्केवारीच्या संस्कृतीला लगाम घालण्यात आम्ही अपयशी ठरलो. अधिकारी व पदाधिकारी यांनी एकत्रित राहून महापालिकेचा कारभार करणे अपेक्षित आहे. दोघांमध्ये समन्वय गरजेचा आहे. लोकसभा निवडणुकीनंतर गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, महापालिकेतील अधिकारी, पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक घेऊन योग्य तो तोडगा काढला जाईल. अधिका-यांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, नगरोत्थान योजनेतून मोठा निधी आणला आहे. पण ही कामे संथ गतीने सुरू आहेत. त्यामुळे निवडणूक निकालानंतर याकडे पूर्णपणे लक्ष दिले जाईल. पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व दुरवस्था झालेल्या रस्त्यांची कामे पूर्ण केली जातील,अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या वेळी आमदार के.पी.पाटील, नगरसेवक राजेश लाटकर, शारंगधर देशमुख, आदिल फरास, रमेश पोवार, महेश जाधव आदी उपस्थित होते.