मोहनीराज लहाडे

नगर : इंस्टाग्राम व फेसबुकवर बनावट खाते (फेक अकाउंट) निर्माण करण्याच्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुले व महिलांचाही वाढता सहभाग आढळू लागला आहे. यातील बहुसंख्य गुन्हे परचितांकडून, उच्चशिक्षित कुटुंबांत घडल्याचे पोलीस तपासात आढळत आहे. गेल्या सव्वा वर्षांत अल्पवयीन व महिलांचा सहभाग असलेले तब्बल २४ गुन्हे दाखल झाले आहेत.

जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत ‘सायबर क्राइम’चे एकूण ३३ गुन्हे दाखल झाले. त्यातील १४ गुन्हे ‘फेक अकाउंट’चे आहेत. त्यामुळे मुलांच्या हातात मोबाइल देणाऱ्या पालकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता व्यक्त होते.  एके काळी शाळेत, समाजात आपल्या सहकारी विद्यार्थ्यांची, मित्राची चेष्टामस्करी करण्यासाठी मुले विविध मार्गाचा अवलंब करत. परंतु आता त्यासाठी समाजमाध्यमांवर बनावट खाते निर्माण करून, त्याचा आधार घेत त्रास देण्यासाठी, बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करणे, मानसिक त्रास देण्यासाठी केला जात आहे. अशा प्रकारचे बनावट खाते तयार करणे माहिती-तंत्रज्ञान कायद्याच्या दृष्टीने गुन्हा असल्याची अनभिज्ञता या मुलांसह पालकांमध्ये दिसते. त्यातही फेसबुकपेक्षा यासाठी इन्स्टाग्रामचा अधिक वापर होत असल्याचे पोलिसांकडे दाखल झालेल्या गुन्ह्यांवरून आढळते. यासंदर्भात माहिती-तंत्रज्ञान कायद्याचे उल्लंघनासह बदनामी करणे, विनयभंग करणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत.

नगर शहरातील एका नेत्याच्या पत्नीचे फेक अकाउंटह्ण तयार केल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. या नेत्याला त्याबद्दल विरोधकांचा संशय वाटत होता. मात्र पोलिस तपासात शेजारीच राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने हे कृत्य केल्याचे आढळले. त्याचे कारणही क्षुल्लक स्वरूपातील वादाचे होते. दोन शाळकरी मुलांनी आपल्या शिक्षिकेचे फेक अकाउंटह्ण तयार करून ते ‘पोर्नोग्राफी साइटच्या लिंक’ला जोडले. दोन मैत्रिणींनी एकमेकीच्या मत्सरापोटी, विद्यार्थ्यांने वर्गातील विद्यार्थिनीचे, विभक्त होऊ पाहणाऱ्या पत्नीने पतीची बदनामी करण्यासाठी असे प्रकार केल्याचे आढळले आहे. या सर्व प्रकारांमध्ये केवळ वाद, द्वेषापोटी असे प्रकार केल्याचे निदर्शनाला आले आहे. परंतु पोलिसांनी कायद्यानुसार कारवाई केली आहे. यातील काही मुला-मुलींचे वय अवघे १४-१५ वर्षांचे आहे. आठवी, नववीच्या वर्गात ते शिकतात. त्यामुळे इंस्टाग्राम, फेसबुकवर आपले व्यक्तिगत प्रोफाइल तयार करताना, छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करताना सतर्कता ठेवण्याची आवश्यकता निर्माण होते. अशा स्वरूपाच्या गुन्ह्यातील अल्पवयीन मुले सुशिक्षित कुटुंबातील आढळली, आई-वडील डॉक्टर किंवा शिक्षक-शिक्षिका आहेत. बहुसंख्य कुटुंबे शहरी भागात राहणारे आहेत. ग्रामीण भागात अपवादानेच असे गुन्हे घडले आहेत. त्यामुळे पालकांनी समाजमाध्यमांवर आपली मुले काय करतात, याकडे लक्ष ठेवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. 

कोणती काळजी घ्यावी?

  • आपला यूजर आयडी व पासवर्ड कोणाला देऊ नये.
  • कुटुंबाचे व महिलांचे फोटो ‘अपलोड’ करू नयेत.
  • ‘प्रायव्हसी सेटिंग लॉक’ करावे, आपले ‘प्रोफाइल’ सर्वाना दिसणार नाही, अशा पद्धतीने सेटिंग करावे.
  • ‘इंस्टाग्राम’ व ‘फेसबुक’च्या माध्यमातून महत्त्वाची कागदपत्रे पाठवू नयेत.
  • मुलांच्या ‘इंस्टाग्राम’ व ‘फेसबुक’ वापराकडे पालकांनी लक्ष द्यावे.

जनजागृतीचे कार्यक्रम 

पोलिसांचा सायबर क्राइम विभाग समाजमाध्यमांच्या वापराबद्दल विद्यार्थ्यांत सतर्कता निर्माण होण्यासाठी शाळा व महाविद्यालयातून माहिती देतो. ‘इंस्टाग्राम’, ‘फेसबुक’सारखी समाजमाध्यमे वापरताना कोणती काळजी घ्यावी, ‘सायबर क्राइम’ म्हणजे काय याची माहिती दिली जाते. ‘सायबर क्राइम’ कसे टाळता येतील, कसे रोखावेत याबद्दल जागृती केली जाते. त्यासाठी कार्यक्रम घेतले जातात. माहिती पत्रके तयार करून बसस्थानक, रेल्वे स्थानक, गर्दीच्या ठिकाणी लावण्यात आली आहेत.

पालकांनी लक्ष ठेवण्याची आवश्यकता

पालकांनी आपली मुले मोबाइलचा वापर योग्य कारणासाठी करत आहात की दुसऱ्याच, भलत्याच कारणासाठी करत आहेत, त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. समाजमाध्यमांचा वापर कशा पद्धतीने करावा? त्याचा चुकीचा वापर केल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो याची जाणीव करून द्यावी. गुन्हा दाखल झाल्यास भविष्यात नोकरीचे प्रश्न निर्माण होऊ शकतात, याची माहिती पालकांनी द्यावी. व्यक्तिगत छायाचित्रे इंस्टाग्राम, फेसबुकवर ठेवू नयेत किंवा त्यामार्फत कागदपत्रेही पाठवू नयेत.

– ज्ञानेश्वर भोसले, पोलीस निरीक्षक, सायबर क्राइम, नगर.