मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ३२ विद्यार्थ्यांनी विविध दलालांना पैसे देऊन बनावट जात प्रमाणपत्रे बनवून घेतल्याचे समोर आले आहे. बनावट जात प्रमाणपत्राआधारे अनुसूचित जमातीच्या कोट्यातून या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून या प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली.
बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमात अनुसूचित जमातीच्या कोट्यातून प्रवेश घेतल्याबद्दल काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी विधान परिषदेत प्रश्न मांडला होता. या प्रश्नाच्या लेखी उत्तरात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कबूली दिली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेताना अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांचे जमात वैधता प्रमाणपत्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेस उपलब्ध करून दिले होते. त्यापैकी ३२ उमेदवारांची जमात वैधता प्रमाणपत्रे बोगस असल्याचे या संस्थेने राज्य सामाईक प्रवेश परीक्षा केंद्राला कळविले.
त्यानंतर सामाईक प्रवेश केंद्राने या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेल्या संस्थांशी संपर्क साधून त्यांना आणि विद्यार्थ्यांना सात दिवसांच्या आत खुलासा करण्याचे निर्देश दिले होते, असे मंत्री पाटील यांनी उत्तरात नमुद केले आहे. पालक, विद्यार्थी आणि संस्थाचालक यांच्याकडून प्राप्त झालेल्या खुलाशात बहुतांश विद्यार्थ्यांनी जमात वैधता प्रमाणपत्रे विविध एजंटांकडून अतिरिक्त पैसे देवून प्राप्त करुन घेतल्याचे समोर आले. या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरु असल्याचेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
