कराड : पाटण तालुक्यातील उरुल येथे बनावट भारतीय चलनी नोटा खपविण्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत ५०० रुपयांच्या १७ बनावट भारतीय चलनी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून, हे एक मोठे रॅकेट उघडकीस येत असून, आणखी जणांचा सहभाग निष्पन्न होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी राजेंद्र गणपतराव थोरात (वय ४२, रा. उरुल, ता. पाटण, जि. सातारा) याने चौकशी दरम्यान, या बनावट नोटा नितीन जलदेव निकम (वय ४७, रा. उरुल, ता. पाटण) याच्याकडून घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार उरुल स्टँड परिसरात छापा टाकला असता तेथे नितीन निकम हा आणखी दोन संशयितांसह महिंद्रा थार या वाहनात आढळून आला.

तिघांनाही ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्यात आली असता, सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पुढील चौकशीत नितीन निकम याने या बनावट नोटा मनोज दशरथ निकम (वय ३६, रा. वर्धमान चौक, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) आणि गौसपाक अब्दुलरज्जाक जमादार (वय ३९, रा. शिवाजीनगर, कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांच्याकडून घेतल्याची तसेच त्या खपविण्यासाठी राजेंद्र थोरात याला दिल्याची कबुली दिली.

यानंतर मनोज निकम याची चौकशी करण्यात आली असता, त्याने या बनावट नोटा आशुतोष राऊत (रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) याच्याकडून मिळाल्याचे पोलिसांना सांगितले. दरम्यान, २ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे १०.३८ वाजता पोलिसांनी राजेंद्र थोरात यांच्या उरुल येथील राहत्या घराची झडती घेतली. घरातील बेडरूममधील लोखंडी कपाटाच्या लॉकरमधून ५०० रुपयांच्या १७ बनावट भारतीय चलनी नोटा जप्त करण्यात आल्या.

या प्रकरणात नितीन जलदेव निकम, मनोज दशरथ निकम, गौसपाक अब्दुलरज्जाक जमादार, आशुतोष राऊत आणि राजेंद्र गणपतराव थोरात या पाच जणांविरुद्ध बनावट भारतीय चलनी नोटा तयार करणे, बाळगणे व त्या चलनात खपविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, बनावट नोटांचे जाळे आणखी कुठपर्यंत पसरले आहे, तसेच यामागे इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.