कोरोनामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती देणारं बनावट पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. मात्र या पत्रकावर विश्वास ठेवू नका. कारण असं कोणतंही पत्रक केंद्रीय मंत्रालयाने प्रसिद्ध केलेलं नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नावाने हे पत्र व्हायरल करण्यात आलं आहे. मात्र या पत्रकावर आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन राज्य सरकारने केलं आहे.

काय म्हटलं आहे पत्रकात?

महाराष्ट्र, गुजरात, सिक्कीम आणि उत्तर प्रदेशात 14 ते 21 मार्च या दरम्यान शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शाळा बंद न ठेवल्यास 5 हजारांचा दंड होईल असाही इशारा देण्यात आला आहे. हे पत्र व्हायरल होताच राज्यातल्या शाळांबाबचा निर्णय केंद्र सरकार कसा जाहीर करु शकतं असा प्रश्नही चर्चिला गेला. त्यानंतर हे पत्र बनावट आहे हे राज्य सरकारनेच स्पष्ट केलं.

राज्य सरकारने काय म्हटलं आहे?
केंद्र शासनाचा हवाला देऊन 14 ते 21 मार्च दरम्यान राज्यातल्या शाळांना सुट्टी आहे असं पत्रक व्हायरल होतं आहे. या पत्रकावर आणि अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. हे पत्र बनावट असून राज्य शासनाने यासंदर्भात केंद्र शासनाकडे विचारणा केली आहे. केंद्र शासनाने असे कोणतेही पत्रक जारी केलेले नाही. त्यामुळे अशा पत्रकांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.