अहिल्यानगर: कोणत्यातरी भलत्याचा रसायनांपासून तयार केलेले शाम्पू नामांकित कंपन्यांचे असल्याचे भासवून त्याची ग्रामीण भागातील आठवडे बाजारात विक्री करणाऱ्या टोळीतील तिघांना अहिल्यानगरच्या एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. अटक केलेली तिघेही उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी ही माहिती दिली. पोलिसांनी एमआयडीसीलगत असलेल्या नागापूर भागातील आठवडे बाजारात ही कारवाई केली. नागापूर परिसरात एमआयडीसीमध्ये काम करणारे परप्रांतीय कामगारांच्या वसाहतींचा म्हणून ओळखला जातो.

शानमोहम्मद पप्पूखान आलबी, त्याचे साथीदार रब्बानी रज्जाक अब्बास व फैजान अहमदअली खान (तिघेही रा. इस्लामनगर, हाथरस, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. या तिघांकडून १ लाख १८६ रुपये किमतीच्या रसायन मिश्रणाने भरलेल्या बाटल्या, बाटल्या पॅकिंगसाठी लागणारे साहित्य, बनावट शाम्पू बनवण्यासाठी लागणारे रसायन व पावडर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या संदर्भात हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीचे अधिकारी किरीत गुणवंतराव पंड्या यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यांनीच दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ही टोळी हिंदुस्तानी युनिलिव्हर लिमिटेड कंपनीसह इतरही विविध कंपन्यांच्या शाम्पूच्या बाटल्या वापरून, त्यामध्ये कोणतेतरी रसायन मिश्रण भरून तो अस्सल शाम्पू म्हणून ग्राहकांना विक्री करून फसवणूक करत होते. हा बनावट शाम्पू मानवी शरीरास अपायकारक आहे, हे माहिती असूनही स्वतःच्या आर्थिक फायद्या करता जाणीवपूर्वक बनावट ट्रेडमार्क, बनावट लेबल वापरून विक्री करत होते. ही टोळी ग्रामीण भागात, वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या आठवडे बाजारातून या बनावट शाम्पूची सर्रासपणे विक्री करत होती.

तशी कबुलीही आरोपींनी दिल्याचे सहाय्यक निरीक्षक चौधरी यांनी सांगितले. रसायन मिश्रणाने भरलेल्या बाटल्यांवर बनावट लेबल चिटकवून ते नामांकित कंपन्यांचे असल्याचे भासवले जात होते. उत्तर प्रदेशमध्येच या बाटल्या भरून आणून त्या अहिल्यानगर जिल्ह्यात विकल्या जात होत्या. पोलीस उपअधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक चौधरी प्रभारी अंमलदार राकेश खेडकर राजू सुद्रिक शैलेश रोहकले सचिन अडवल किशोर जाधव दीपक फुंदे नवनाथ दहिफळे राहुल गुंडू यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.