रत्नागिरी : जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर अल्पवयातही मोठी कामगिरी करता येते, याचा प्रत्यय पोदार इंटरनॅशनल स्कूल, रत्नागिरी येथील इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी कु. फलक मुझम्मील टेमकर हिने करून दिला आहे. अवघ्या पाचव्या वर्षी तिने ३ मिनिटांत सर्वाधिक हुला हूप फिरवण्याचा अधिकृत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करत इतिहास रचला आहे.
हुला हूपिंगची आवड लहान वयातच निर्माण झालेल्या फलकने कोणतेही औपचारिक प्रशिक्षण न घेता स्वतःच्या जिद्दीने आणि सातत्यपूर्ण सरावातून हे कौशल्य आत्मसात केले. सुमारे तीन महिन्यांच्या मेहनतीनंतर तिने २२ नोव्हेंबर २०२५ रोजी हा विक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. या विक्रमासाठीची अर्ज प्रक्रिया १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सुरू झाली होती. सर्व आवश्यक पुरावे सादर केल्यानंतर १० एप्रिल २०२६ रोजी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडून तिच्या कामगिरीला अधिकृत मान्यता मिळाली.
फलकच्या या यशामागे तिचा आत्मविश्वास, अविरत सराव आणि कुटुंबीयांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरला आहे. तिच्या या कामगिरीमुळे केवळ कुटुंबीयच नव्हे, तर संपूर्ण पोदार परिवाराचा अभिमान उंचावला आहे. देशभरातील विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणास्थान ठरली असून, “वय हे केवळ संख्या आहे,” हे तिने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. पोदार इंटरनॅशनल स्कूल, रत्नागिरीच्या व्यवस्थापन, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी तिच्या या यशाबद्दल अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
