मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर कुटुंब निवृत्तीवेतनधारक अपंग तसेच मानसिक विकारांनी त्रस्त असलेल्या वारसांना सरकारने दिलासा दिला आहे. यापूर्वी दर तीन वर्षांनी अंपगत्व प्रमाणपत्र सादर करण्याची अट शिथील केली असून यापुढे कायमस्वरूपी मानसिक विकृती किंवा अपंगत्व असल्यास तसे सिद्ध करणारे वैद्यकीय प्रमाणपत्र एकदाच द्यावे लागणार आहे आणि तात्पुरते अपंगत्व असल्यास तीन वर्षांऐवजी पाच वर्षांनी हे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे.
वित्त विभागाने मनोविकृत तसेच अपंग वारसांच्या कुटुंब निवृत्तीवेतनधारकांविषयीचा शासन निर्णय मंगळवारी निर्गमित केला. यासंदर्भात महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील संबंधित तरतुदींमध्ये हा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी मनोविकृती, मानसिक दुर्बलता किंवा शारीरिकदृष्ट्या अपंगत्व/विकलांगत्व असलेल्या पात्र मुलगा किंवा मुलीच्या बाबतीत संबंधित व्यक्ती अजूनही अपंग असल्याचे सिद्ध करण्यासाठी दर तीन वर्षांनी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. नव्या निर्णयानुसार, संबंधित व्यक्तीला कायमस्वरूपी अपंगत्व असल्याचे सिद्ध करण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र एकदाच सादर करावे लागेल, मात्र अपंगत्व तात्पुरते असल्यास दर पाच वर्षांनी प्रमाणपत्र सादर करावे लागेल. त्यामुळे कायमस्वरूपी अपंगत्व असलेल्या कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या पात्र मुलांना वारंवार वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्याची आवश्यकता राहणार नाही.
शिक्षण संस्थांनाही लागू
हा निर्णय निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी व कृषितर विद्यापीठे तसेच त्यांच्याशी संलग्न अशासकीय महाविद्यालयांतील निवृत्तिवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनाही योग्य त्या फेरफारांसह लागू राहणार आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमातील तरतुदींनुसार जिल्हा परिषदांच्या निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनाही हा निर्णय लागू राहणार आहे. राज्य सरकारचे निवृत्ती वेतन योजना लागू असणारे लाखो कुटुंब निवृत्तीवेतनधारक असून त्यात अपंगत्व असलेल्या त्यांच्या वारसांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
