अकोले: तालुक्याचे भूमिपुत्र असणारे प्रसिद्ध चित्रकार सुरेशचंद्र भाऊराव आवारी यांचे काल, सोमवारी रात्री मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने कला क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. आज, मंगळवारी इंदुरी (ता. अकोले) या त्यांच्या मूळ गावी प्रवरातिरी त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात पत्नी उषा, दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

इंदुरीसारख्या छोट्याशा गावात जन्मलेल्या सुरेशचंद्र आवारी यांनी आपली प्रतिभा, चिकाटी आणि साधनेच्या बळावर मुंबईच्या व्यापक कलाविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. ‘मुंबई लोकल‘ या त्यांच्या चित्राला ललित कला अकादमीचे (दिल्ली) राष्ट्रीय पारितोषिक मिळाले होते. मुंबईच्या सर जे जे स्कूल ऑफ आर्ट येथे काही वर्षे अधिव्याख्याता म्हणून त्यांनी काम केले. मुंबईतील प्रतिष्ठित जहांगीर आर्ट गॅलरी, गोवा ललित कला अकादमी, नवी दिल्ली येथील कला अकादमी, बजाज व ताज आर्ट गॅलरी आदी ठिकाणी त्यांची शंभरावर चित्र प्रदर्शने भरविण्यात आली होती. या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांची चित्रे जगभर पोहचली आहेत.

भारत सरकारच्या डिझाइन विभागात सेवा करीत असताना येवला येथील जगप्रसिद्ध पैठणीच्या काही डिझाइन त्यांच्या प्रतिभेतून साकारल्या. महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांच्या हस्ते राज्य सरकारने त्यांचा विशेष गौरवही केला होता. चित्रकारांनी काढलेली चित्रे, शिल्पकारांनी घडवलेली शिल्पे व वास्तु यावरूनच इतिहास लिहिला जातो. अकोल्याचा इतिहास लिहितांना चित्रकार सुरेश आवारी यांच्या शिवाय तो पुर्ण होऊ शकणार नाही अशी भावना येथील चित्रकार मीनानाथ खराटे यांनी व्यक्त केली.

“भोपाळ येथे इंदिरा गांधी यांच्या संकल्पनेतून पपूल जयकर यांनी “भारत भवन “ही संस्था उभारली, त्यात संग्राहलयात एक भाग चित्रांच्या कक्षात नामवंत चित्रकारांची प्रत्येकी दोन चित्रे, त्यात सुरेश आवारी यांची दोन चित्रे जीं मी १९९० ला पाहिली अन मन उंचबळून आले होते. कारण लहानपणी आम्ही शाळेत असताना ते लिंबाच्या झाडाखाली, जे त्यांच्या घराजवळ, कधी नदीवर चित्रे काढीत, ते मी पाहिले होते, अशी आठवण कोकण कृषी विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक सुखदेव काळे यांनी सांगितली.

आवारी यांची चित्रशैली वैशिष्ट्यपूर्ण व स्वतंत्र होती. व्यक्तिचित्र या विषयात त्यांना विशेष रस होता. त्यांनी साकारलेली अनेक व्यक्तीचित्रे गाजली. मोठा लौकिक मिळूनही आवारी यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत साधे, नम्र व निगर्वी होते. दिग्गज चित्रकारांशी,कलाप्रेमींशी त्यांचे ऋणानुबंध होते, तरीही त्यांनी कधीही प्रसिद्धीचा पाठलाग केला नाही. अनेक महत्वाच्या व्यक्ती आणि संस्था यांच्या चित्रसंग्रहात त्यांची चित्रे आहेत. ही अकोलेकरांच्या दृष्टीने निश्चितच अभिमानाची बाब आहे.

आवारी यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून तालुक्याचा नावलौकिक राज्य व राष्ट्रीय पातळीवर पोहोचवला. त्यांचे चित्रविश्व, विचार आणि कलादृष्टी पुढील पिढ्यांना कायम प्रेरणा देत राहील अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.