मुंबई : राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये पहिल्या टप्प्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली. दुष्काळ जाहीर करणे ही केवळ सुरुवात असून, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना थेट व प्रत्यक्ष मदत पोहोचवणे हेच सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषीपंपांच्या वीजबिलात सवलत देण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीत कृषीपंपांची वीजजोडणी खंडित करू नये असे निर्देश देण्यात आले आल्याचे शिंदे यांनी सांगितले.
गेले काही दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकारी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. कृषी आणि महसूल विभागाच्या अहवालाच्या आधारे शनिवारी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला. दुष्काळ जाहीर करण्यापुरती ही प्रक्रिया मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
दुष्काळामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला फटका बसतो. त्यामुळे रोजगार हमी योजनेत अधिकाधिक कामे उपलब्ध करून देण्यासाठी निकषांमध्ये शिथिलता आणली जाईल. पिण्याच्या पाण्याची गरज असलेल्या भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा, पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. जलसंधारणाची कामेही हाती घेण्यात येणार आहेत.
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन परीक्षा शुल्कात माफी देण्यात आली आहे. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. नुकसानीची नोंद छायाचित्रे आणि जीपीएस नोंदीसह करण्यात येणार आहे. त्याआधारे अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे.
लवकरच आर्थिक मदत
पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना देण्यात येणारी आर्थिक मदत स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी टोकाचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन शिंदे यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या १२.५८ लाख शेतकऱ्यांना ऑगस्टअखेर १० हजार ११५ कोटी रुपये वितरित झाल्याची माहिती शिंदे यांनी दिली.
