मागील काही दिवसांपासून कांद्याचे दर गडगडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे. कांद्याला दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले असून ते सरकारविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत. अशी एकंदरीत स्थिती असताना बीडमधील एका शेतकऱ्याला साडेतीन टन कांदा विकून हाती रुपयाही आला नाही. याउलट संबंधित शेतकऱ्याला स्वत:जवळील १८३२ रुपये व्यापाऱ्याला द्यावे लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत माहिती देताना शेतकऱ्याच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आलं आहे. कांद्याने शेतकऱ्याला रडवलं आहे. साडेतीन टन कांदा विक्री करून शेतकऱ्याच्या पदरी काहीच पडलं नाही. उलट अडत व्यापाऱ्यालाच अठराशे रुपये द्यावे लागले.

भागवत डांबे असं या शेतकऱ्याचं नाव असून ते बीड तालुक्यातील रहिवाशी आहेत. त्यांनी आपल्या दोन एकर शेतात कांद्याची लागवड केली होती. काद्यांचे बियाणे, लागवडीचा खर्च, खुरपणी, फवारणी खते आणि कापणीचा खर्च असा एकूण ७० हजार रुपयांचा खर्च त्यांनी केला. यातून त्यांनी १२० गोण्या भरून कांदा सोलापूरच्या बाजारात पाठवला. कांदा विक्री केल्यानंतर शेतकऱ्याच्या हाती काहीच उरले नाही. शिवाय डांबे यांना स्वत: जवळीलच १८३२ रुपये द्यावे लागले. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याची एक प्रकारे थट्टाच पाहायला मिळाली.

घरी परत यायला तिकिटासाठीही पैसे नव्हते- भागवत डांबे

याबाबत प्रतिक्रिया देताना कांदा उत्पादक शेतकरी भागवत डांबे म्हणाले, “या दोन एकर शेतात कांद्याची लागवड केली होती. हा कांदा सोलापूरला विक्रीसाठी नेला होता. कांद्याचं वजन साडेतीन टन भरलं. लाखभर रुपये मिळतील आणि त्यात कसाबसा उदरनिर्वाह होईल, असं वाटलं. पण हाती एक रुपयाही मिळाला नाही. उलट आम्हालाच पैसे द्यावे लागले. त्यामुळे आम्ही जगायचं कसं? मुलांचं शिक्षण कसं करायचं? असा प्रश्न आहे. कांदा विक्री करून परत घरी येण्यासाठी तिकीटासाठीही पैसे नव्हते. खुरपणी, फवारणी, बियाणे याचा खर्च पकडून माझ्यावर आता ६९ हजार रुपयांचं कर्ज झालं आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer bhagwat dambe sell 3500 kg onion not get single rupee give 1832 rs extra to trader solapur rno news rmm
First published on: 21-03-2023 at 19:05 IST