वाढलेल्या कर्जाचा डोंगर कसा हटवायचा, याची विवंचना सतावत असतानाच गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे हादरलेल्या एका शेतक-याने आत्महत्येचा मार्ग पत्करल्याची घटना मोहोळ तालुक्यातील विरवडे येथे घडली. सोलापूर जिल्हय़ातील गारपीटग्रस्त शेतक-यांनी आत्महत्या करण्याची ही चौथी घटना आहे.
विरवडे येथे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी शेतक-याचे नाव दादासाहेब हरिदास अवताडे (६२) असे आहे. विरवडे गावच्या शिवारात अवताडे यांची सहा एकर शेतजमीन आहे. मागील दोन वर्षे सलग दुष्काळाशी सामना केल्यानंतर यंदाच्या वर्षी त्यांनी आपल्या शेतात दोन एकर क्षेत्रात गव्हाचे पीक घेतले होते. योग्य पाऊसमानामुळे गव्हाची शेती चांगली बहरली होती. हाता-तोंडाशी गहू आला असतानाच दुर्दैवाने गारपीट व वादळी वा-यासह अवकाळी पावसाने थैमान घातले. त्यामुळे क्षणार्धात गव्हाचे पीक भुईसपाट झाले. अवताडे यांनी यापूर्वीच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पीककर्ज घेतले होते. तसेच काही खासगी सावकारांकडूनही त्यांनी कर्ज घेतले होते. या कर्जाचा डोंगर वाढला असताना तो कसा दूर करायचा, याची विवंचना अवताडे यांना होती. शेतात बहरलेला गहू बाजार विक्री करून पैसे येतील व त्यातून कर्जाची परतफेड करता येईल, अशी आशा त्यांनी बाळगली होती. परंतु गारपिटीमुळे डोळय़ांदेखत शेतातील गहू वाया गेल्याने अवताडे यांच्या मानसिक धक्का बसला. त्यातून त्यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मोहोळचे आमदार प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्यासह तालुका पंचायत समितीचे सभापती भारत गायकवाड, तहसीलदार सदाशिव पडदुणे यांनी विरवडे येथे धाव घेऊन अवताडे कुटुंबीयांचे सांत्वन केले.
सोलापूर जिल्हय़ात गारपिटीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा फटका बसून आतापर्यंत चार शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापूर्वी मोहोळ तालुक्यातील सारोळे येथे ज्ञानदेव भागोजी थोरात (६५) या शेतक-याने आत्महत्या करून मृत्यूला जवळ केले होते. याशिवाय अंत्रोळी (ता. दक्षिण सोलापूर) येथे रखमाजी थोरात (४५) तर कुर्डूवाडीजवळ सोमनाथ हणमंत मदने (२५) यांनी आत्महत्या केली होती.