२६ एकर जमीन गिळूनही सावकारी हाव संपेना!

आपली रक्कम मिळाल्यावर देखील सावकारांनी कुटुंबीयांचा छळ सुरुच ठेवला.

Farmer father tortured
प्रतिनिधिक छायाचित्र

तीन वर्षांपासून मुलगा परागंदा; शेतकरी पित्याचा छळ

एकदोन नव्हे, तर तब्बल ३४ सावकारांनी मिळून परंडा तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबाला जगणे मुश्कील करून टाकले आहे. जमीन विकून या सर्व सावकारांचा ३० लाख रुपयाचा परतावा करूनही नागनाथ कुलकर्णी यांच्यामागील तगादा काही संपेना. वारंवार तक्रारी देऊनही प्रशासनाने कारवाईचे धाडस न दाखविल्यामुळे तीन वर्षांपासून मुलगा परागंदा आणि शेतकरी पित्याचा अमानुष छळ सुरूच आहे.

परंडा तालुक्यातील कंडारी येथील नागनाथ मरतड कुलकर्णी यांचा मुलगा गजानन उर्फ चंद्रशेखर कुलकर्णी याने एक-दोन नव्हे तर ३४ सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले. सुरुवातीला रक्कम कमी असल्यामुळे नागनाथ कुलकर्णी यांनी व्याजासह परतावादेखील केला. मुलाने घेतलेली रक्कम व्याजासह वडिलांकडून परत मिळत आहे, हे लक्षात आल्यावर यापैकी अनेक सावकारांनी अव्वाच्या सव्वा आकडे सांगून वसुलीसाठी तगादा सुरु केला. हा तगादा धमकी, मारहाण एवढय़ावर न थांबता शेतातील साहित्य आणि जनावरेही उचलून नेण्यापर्यंत गेला. वैतागलेल्या नागनाथ कुलकर्णी यांनी गावातील जुलमी सावकारांचा बंदोबस्त करावा म्हणून भूम येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार करुन दोन वर्षांचा कालावधी उलटला आहे. पोलिसात तीन वेळा तक्रारही दिली. कारवाई शून्य. त्यामुळे सावकारांचे मनोबल वाढले. कुलकर्णी यांना जमीन विकून ३० लाख रुपये सावकारांच्या घशात घालावे लागले.

आपली रक्कम मिळाल्यावर देखील सावकारांनी कुटुंबीयांचा छळ सुरुच ठेवला. सावकारी जुलमाला वैतागल्याने कुलकर्णी यांचा मुलगा परागंदा आहे. ४२ एकरपैकी २६ एकर जमीन लक्ष्मीबाई डांगे, तुकाराम देशमाने, जयराम नलावडे या सावकारांनी स्वतच्या नावे करुन घेतली. तक्रार देऊनही काहीच झाले नसल्याची खंत कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

पोलीस आणि सहकार उदासीन

कुलकर्णी यांनी तर चार वर्षांत अनेकदा प्रशासनाचे दार ठोठावले. मात्र, त्यांच्या मदतीला कायदा अथवा कायद्याचे रक्षक कोणीच आले नाही. परिणामी जमीन, ३० लाखाची रोकड आणि एकुलता एक मुलगाही सावकारी जाचामुळे त्यांच्यापासून दुरावला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Farmer father tortured by 34 moneylender in paranda taluka

ताज्या बातम्या