मुंबई: कृषी विभागाच्या योजनांचा लभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्राची आवश्यकता असते. मात्र अद्यापही राज्यातील अनेक शेतकऱ्यांकडून शेतकरी ओळखपत्र काढण्यात आलेले नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी २० मे पूर्वी आपले शेतकरी ओळखपत्र काढावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. यासाठी शेतकऱ्यांना आपल्या नजीकच्या सेवा सुविधा केंद्रावर किंवा ॲग्रीस्टॅक पोर्टद्वारे ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.

राज्यात १४ नोव्हेंबर २०२४ पासून ॲग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे. तसेच १५ एप्रिल २०२५ पासून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले. आतापर्यंत एकूण १.७१ कोटी खातेदार संख्या असून यापैकी १.३२ कोटी शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र काढलेले आहे. यापुढे कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच विविध कृषी निविष्ठा (बियाणे, खते, औषधे इ.) प्राप्त करण्यासाठी शेतकरी ओळखपत्र आवश्यक राहणार आहे.

हे ओळखपत्र काढण्यासाठी राज्य सरकारने अनेक ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याविषयी अधिक माहितीसाठी कृषी अधिकाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली आहे. अमरावती विभागात सहाय्यक कृषी अधिकारी अजितकुमार गेजगे मोबाईल नंबर ९६५७१०९८०९, पुणे विभागात सहाय्यक कृषी अधिकारी संगीता ननावरे ७५८८५०९४९२, कोकण विभागात सहाय्यक कृषी अधिकारी सोनाली वाडेकर ९४०४९५३५१८, छ. संभाजीनगर सहाय्यक कृषी अधिकारी शीतल कौदरे ९१७२३१९६३७, नागपूर विभागात सहाय्यक कृषी अधिकारी अजितकुमार गेजगे ९६५७१०९८०९, नाशिक विभागात सहाय्यक कृषी अधिकारी सोनाली वाडेकर ९४०४९५३५१८ यांच्याशी फार्मर आयडी नोंदणी संदर्भात कोणतीही अडचण आल्यास संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

तर वर्षाला १२ हजार मिळणार नाहीत

शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत भारत सरकारकडून वर्षाकाठी ६००० रुपये दिले जातात. तर राज्य सरकारकडून ६००० दिले जातात, परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने पात्रतेचे काही निकष निश्चित केले आहेत. सरकारी योजनांचा लाभ घेणे आता शेतकऱ्यांना पूर्वीइतके सोपे होणार नाही. कृषी स्टॅक प्रकल्पांतर्गत केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांची डिजिटल ओळख तयार करत आहे. ज्याला फार्मर आयडी असे नाव देण्यात आले आहे. शेतकऱ्याकडे शेतकरी ओळखपत्र नसेल तर. त्यामुळे पीएम किसान सन्मान निधीसारख्या योजनांचे हप्ते अडकू शकतात.

शेतकरी ओळखपत्र तयार करण्यासाठी शेतकऱ्याला त्याच्या राज्याच्या अ‍ॅग्रीस्टॅक पोर्टलवर जावे लागेल. तेथे Create New User या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागेल आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. अटी वाचल्यानंतर आणि संमती दिल्यानंतर फॉर्म सबमिट करावा लागेल.