आयातशुल्क घटीची आवई; खाद्यतेलाची दरघट

खरीप हंगामातील नवे उत्पादन कसे येईल यावर पुन्हा तेजी-मंदीचे आडाखे बांधले जातात.

|| प्रदीप नणंदकर

लातूर : ‘लांडगा आला रे आला’ अशी भीती दाखवत प्रत्यक्षात ‘लांडगा’ न येताच मोठे नुकसान सोसण्याची वेळ शेतकरी-उत्पादकांवर आली आहे. खाद्यतेलाच्या आयात शुल्कात घट होण्याची आवई उठवल्याने त्याचे दर २५ रुपयांनी घसरले आहेत.

गेल्या वर्षभरात खाद्यतेलाच्या दरात ८० टक्के वाढ झाली होती. मात्र, गेल्या आठवड्याभरापासून आयात शुल्कात घट होणार असल्याची आवई उठवून खाद्यतेलाच्या भावात टनामागे ३०० डॉलर आणि किलोमागे २५ रुपयांची घट झाली आहे.

खाद्यतेलाच्या आयात शुल्कात कपात केली जाणार नसल्याचे केंद्र सरकारने अधिकृतपणे जाहीर केले असले, तरीही त्याचा परिणाम खाद्यतेलाचे भाव स्थिर राहण्यात झाला नाही. कारण बाजारातील भाववाढ दलालांनी केलेली कृत्रिम वाढ होती. परदेशातून आयात करण्यात येणाऱ्या तेलापैकी देशातील प्रमुख पाच बंदरानजीकच्या गोदामांत सुमारे १५ लाख टन खाद्यतेल साठवून ठेवत कृत्रिम भाववाढ करण्यात आली होती. आयात शुल्कात घट होत नाही हे लक्षात घेऊन घट होणार असल्याची आवई उठवण्यात आली आणि त्यानंतर तेलाचे बाजारभाव पडले. ऐन पेरणीच्या वेळी खाद्यतेलाच्या भावात घट झाल्याने सोयाबीनच्या भावात क्विंटलमागे सध्या सुमारे ५०० रुपयांची घट झाली आहे.

बाजारात असलेले खाद्यतेल त्याची साठवणूक करणाऱ्या सर्व दुकानदारांनी महागात खरेदी केलेले असतानाही तोटा सहन करत त्यांना ते कमी भावानेच विकावे लागणार आहे. खाद्यतेलाचे भाव वाढत होते तेव्हा त्यात केंद्र सरकारने हस्तक्षेप केला नाही आणि आता सरकारी हस्तक्षेप करत नसतानाही भाव पडत असल्याने सरकार ‘हाताची घडी आणि तोंडावर बोट’ अशा अवस्थेत आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

वायदे बाजारात शेतमालाची खरेदी-विक्री करताना केवळ १० टक्के गुंतवणूक करावी लागते. या गुंतवणुकीवर त्याला १०० टक्के शेतमालाची खरेदी-विक्री करता येते. याउलट बाजारपेठेत खरेदी-विक्री करणाऱ्यास १०० टक्के पैसे रोखीने द्यावे लागतात.

या वर्षी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच तेलबियांचे भाव गगनाला भिडवले गेले. त्याचा फायदा शेतकऱ्यांना कमी आणि दलालांना अधिक झाला. आता बाजारपेठेत आलेली मंदी आणखी दोन महिने अशीच राहण्याची शक्यता आहे.

खरीप हंगामातील नवे उत्पादन कसे येईल यावर पुन्हा तेजी-मंदीचे आडाखे बांधले जातात. दलालांना आळा घालणारी कोणतीच यंत्रणा सक्षम नाही. ‘एसीडीक्स’चा वापर शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून करण्याची कल्पना होती. मात्र, यात शेतकरी बाजूला पडत दलालांचे हित साधण्यावरच भर दिला जात आहे.

कोणत्या का कारणामुळे होईना खाद्यतेलाच्या भावात झालेल्या घटीमुळे सामान्य माणूस खूश झाला आहे. वर्षभरात त्याच्या घरगुती अंदाजपत्रकात खाद्यतेलाच्या भाववाढीमुळे अडचण निर्माण झाली होती. आता भाव कमी झाल्याने काही प्रमाणात त्याची चिंता दूर झाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Farmer import duty the price of edible oil akp

ताज्या बातम्या