निवडणुकीत मते मिळविण्यासाठी शेतकऱ्यांचा पुळका दाखवला जातो. परंतु नंतर त्याचा विसर पडून ‘जलसंपदा’, ‘ऊर्जा’कडे लक्ष दिले जाते, असा अप्रत्यक्ष टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता लगावतानाच ‘यापुढे हा प्रकार थांबवून शेतकऱ्यांविषयी कायमचे धोरण राबविले पाहिजे’, असा जाहीर सल्लाही कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मंगळवारी येथे आयोजित कार्यक्रमात दिला. विखे यांच्या या वक्तव्याची चर्चा कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांत  रंगली.
लातूरच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयास दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या नावाने नामकरण व सभागृहाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील होते. आमदार दिलीपराव देशमुख, अमित देशमुख, वैजनाथ शिंदे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष विजयराव कोलते उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या हितासाठी पैसे खर्च करायचे म्हटले, की अडचणींचा पाढा वाचला जातो, असा राज्यातील आघाडी सरकारला ‘घरचा आहेर’ देऊन विखे म्हणाले, की शेतकरी हिताचे धोरण सातत्याने राबविण्यासाठी कृषी विभागाचा स्वतंत्र अर्थसंकल्प असायला हवा. राज्यात मराठवाडा, नगर आदी भागावर पुन्हा दुष्काळाचे सावट आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ात ८ हजार मिमी वृष्टी, तर विदर्भात अतिवृष्टीमुळे ४० लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी होऊ शकली नाही. लातूर, उस्मानाबाद, बीड व नगर जिल्हय़ांत अजूनही पिण्याच्या पाण्याचे संकट आहे. या भागासाठी कृत्रिम पावसाच्या पर्यायावर विद्यापीठाने भूमिका घ्यावी. कृषी विभागाने या वर्षी खते, बियाणे क्षेत्रातील काळा बाजार संपवला. दुसऱ्या टप्प्यात शेती उत्पादनाची साखळी निर्माण करून शेतकऱ्याला त्याच्या मालाची किंमत ठरवता येणारी यंत्रणा उपलब्ध करण्याचे धोरण घेण्यात येणार आहे.
‘लातूरला कृषी विद्यापीठ व्हावे’
मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत ८ जिल्हे येतात. हवामानाप्रमाणे विभागात २ भाग पडतात. लातूर, उस्मानाबाद, बीड आदी भागासाठी स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करावे. लातूर महाविद्यालयाकडे ३५० एकर जमीन उपलब्ध असून विद्यापीठ उभारणे सुकर होईल, असे मत अ‍ॅड. झंवर यांच्यासह मान्यवरांनी व्यक्त केले.