कराड : तालुक्यातील भोळेवाडी येथे आज शुक्रवारी दुपारी तुफान अवकाळी पावसातील विजेच्या कडकडाटात शेतकरी दाम्पत्यावर वीज कोसळून सतीश नाथा सूर्यवंशी (५१, रा. भोळेवाडी, ता. कराड) हे जागीच ठार झाले, तर त्यांची पत्नी उषा सतीश सुर्यवंशी या गंभीरपणे जखमी झाल्या आहेत. या दुर्दैवी घटनेने भोळेवाडी परिसर शोकमग्न झाला असून, जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सतीश सूर्यवंशी हे आपली पत्नी उषा व भावजयसह ‘माळ’ नावाच्या शिवारात शेतीच्या कामासाठी गेले होते. आणि दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या जोरदार अवकाळी पावसासह विजांचा प्रचंड कडकडाट सुरू झाला. त्यावेळी पावसापासून बचाव करण्यासाठी सतीश सुर्यवंशी व त्यांची पत्नी उषा हे दोघे जवळील लिंबाच्या झाडाखाली थांबले.

सतीश हे झाडाला टेकून उभे होते, तर उषा या काही अंतरावर बसल्या होत्या. याच वेळी अचानक त्या झाडावर वीज कोसळली. आणि सतीश सूर्यवंशी यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी उषा या विजेच्या धक्क्याने जखमी झाल्या आहेत. यावर जवळच उभ्या असलेल्या त्यांच्या भावजयने आरडाओरड करत ही घटना तातडीने घरच्यांना कळवली. सुर्यवंशी कुटुंबीय व ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु, सतीश सुर्यवंशी यांचे निधन झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर, उषा सुर्यवंशी यांचेवर उपचार सुरू आहेत.