देशाच्या शेती क्षेत्रात महत्त्वाकांक्षी सुधारणा घडवून छोट्या शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचा दावा करणारे तीनही वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केली. दहा दिवसांनी, २९ नोव्हेंबर रोजी सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे कायदे मागे घेतले जातील, असे मोदी यांनी जाहीर केले. तसेच दिल्लीच्या वेशींवर वर्षभर ठिय्या देणाऱ्या शेतकऱ्यांना आंदोलन थांबवून घरी परत जाण्याची विनंती त्यांनी केली.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. “बैल कितीही हट्टी असला तरी,शेतकरी आपले शेत नांगरतो.”, असे ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे. 

यापुर्वी देखील आज सकाळी (शनिवार) मुंबईत पत्रकारांशी बोलताना देखील संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला होता.  “ज्या पद्धतीने ईस्ट इंडियाच्या लोकांनी जालियनवाला बागमध्ये आमच्या विरांना चिरडलं, तसेच लखीमपूर खेरीत सुद्धा या ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांनी जालियनवाला बागेप्रमाणे शेतकऱ्यांना चिरडून मारले. म्हणूनच मला आजची सकाळ शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्याची पहाट वाटते,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त होतं.

“कृषी कायदे मागे घेतल्यानं शेतकऱ्यांच्या दृष्टीने स्वातंत्र्याची पहाट उगवली आहे. दीड वर्षापासून शेतकरी ज्या तणावात, दबावात, दहशतीत होता ते जोखड आता निघालंय. स्वातंत्र्य काय असतं? कंगना रणौत, विक्रम गोखले सांगतात ते स्वातंत्र्य नाही. त्यांची व्याख्या वेगळी असेल. तुमच्या मनावरील जोखड जेव्हा निघून जातं ते स्वातंत्र्य असतं. शेतकऱ्याला त्याच्या आपल्या शेतीचा मालक नाही तर गुलाम बनवणारे हे कायदे होते.” असे देखील संजय राऊत म्हणाले होते. 

संजय राऊत म्हणाले होते, “जसं मोदी सांगत होते तसं हे शेतकरी फक्त २ राज्यांचे नव्हते. हे दोन राज्यांचे शेतकरी देशाच्या शेतकऱ्यांचं प्रतिनिधीत्व करत होते. म्हणून शेवटी सरकारला झुकावं लागलं. ३ काळे कायदे रद्द होत आहेत हा शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्य दिनच आहे. हे स्वातंत्र्य शेतकऱ्यांनी लढून मिळवलं आहे, भिकेत मिळवलं नाही. यासाठी ७०० शेतकऱ्यांनी बलिदान दिल आहे.”