“भूमी अधिग्रहण कायद्यासंदर्भात महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख शरद पवार साहेब यांना भेटणार आहे. त्यांच्यासमोर शेतकर्‍यांच्या भावना मांडणार आहे. हे सर्व थांबवावं अन्यथा महाविकास आघाडी सरकारला महागात पडेल,” असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मुख्यमंत्र्यांना देखील एकच विनंती करेल की, मी शेतकरी नाही. मला शेतीतलं काही कळत नाही, पण मी शेतकर्‍याच्या बाजूने असल्याचं म्हणता मग तुमच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये शेतकर्‍यांवर अन्याय होत असताना तुम्ही गप्प का आहात?, हा प्रश्न मी मुख्यमंत्र्यांना भेटून विचारणार आहे,” असंही राजू शेट्टी म्हणालेत.

“केंद्र सरकारने देशातील राज्यांना भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये काही बदल करून त्याची अमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने त्यासंदर्भात दोन परिपत्रके काढली आहेत. त्यानुसार शेतकर्‍यांच्या जमिनी अधिग्रहित झाल्या तर त्यामधून मिळणारी रक्कम अन्यायकारक आहे. अनेक प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आजपर्यंत चालला आहे. मात्र काटकसरीच्या नावाखाली शेतकर्‍यांचाच गळा घोटला जात असेल तर आम्ही भविष्यात गप्प बसणार नाही. चालू असलेले प्रकल्प बंद पडू आणि आम्ही आमचा अधिकार सोडणार नाही,” असा इशाराच राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलाय.

“दोन वर्षापुर्वी एक ठरले होते की, महाविकास आघाडी सोबत असलेले छोटे छोटे घटक पक्षांची बैठक घ्यायची पण मागील दोन वर्षात एकदाही बैठक झाली नाही. गरज सरली आणि आता वैद्य मेला तरी चालेल,असं त्यांना वाटतंय,” असा टोलाही शेट्टी यांनी लगावलाय. “मुख्यमंत्री मला भेटीसाठी वेळ देतील. जर ते मला वेळ देणार नसतील तर मुख्यमंत्र्यांनी धृतराष्ट्रची भुमिका घेतली असे मी समजेन,” असंही शेट्टी यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer leader raju shetti warns mvm government over land acquisition svk 88 scsg
First published on: 19-01-2022 at 14:51 IST